“एकच नाव… एकच वेदना… पुन्हा घडू नये तिसरी वैष्णवी..!”

पुण्यातील वैष्णवी हगवणे हिच्या आत्महत्येने संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून टाकलेलं असतानाच, अगदी तशीच हृदयद्रावक घटना करमाळा येथे घडली आणि पुन्हा एकदा “वैष्णवी” हे नाव अश्रू आणि आक्रोशाने भारून गेलं. वैष्णवी हगवणे — एक आई, एक सून, एक बायको — तिच्या मनातील आक्रोश इतका दाटला की तिने आपलं जीवन संपवलं. आणि अगदी त्याच पद्धतीने, ११ मे रोजी सायंकाळी करमाळा शहरातील वैष्णवी प्रदीप माने हिनेही आपल्या राहत्या घरात साडीच्या ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केली. तिच्याही मागे चार वर्षांचा मुलगा आहे.
वैष्णवी हगवणेप्रमाणेच वैष्णवी माने हिलाही वैवाहिक आयुष्यातील तणाव, संशय, पैशांसाठीचा मानसिक छळ आणि भावनिक अन्याय यांना सामोरं जावं लागलं. फरक इतकाच — एक पुण्यात, एक करमाळ्यात. पण वेदना, कारणं आणि परिणाम जुळत्या-शब्दासारखे होते. हे केवळ दोन घटना नाहीत, तर संपूर्ण समाजासाठी चेतावणी आहे . ‘मुलगी’ म्हणून जन्मलेल्या व्यक्तीला जिवंत राहण्यासाठी इतका संघर्ष का करावा लागतो?
वैष्णवी मानेच्या मृत्यूनंतर तिच्या माहेरच्यांनी अत्यंत ठाम भूमिका घेतली — जोपर्यंत आरोपींना अटक होत नाही, तोपर्यंत अंत्यविधीसाठी पार्थिव देणार नाही. पोलिसांनी तत्काळ कार्यवाही करत पती आणि सासूला अटक केली. आजारी सासऱ्याला दवाखान्यात दाखल केलं. या सगळ्या तणावपूर्ण परिस्थितीत वैष्णवीचा चिमुकला मुलगा तिच्या आजीकडे सुपूर्त करण्यात आला.
आज महिला सर्वच क्षेत्रांत प्रगती करत आहेत — राजकारण, व्यवसाय, समाजकार्य, शिक्षण, विज्ञान अशा अनेक क्षेत्रांमध्ये महिलांनी स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केलं आहे. पण त्याच समाजात, अजूनही कोणीतरी वैष्णवीसारख्या मुलींना आत्महत्येस प्रवृत्त करत असेल तर आपण खरोखरच कुठे उभे आहोत?
आत्महत्या ही कुठल्याच प्रश्नाचं उत्तर नसतं. संघर्ष करा, लढा द्या, धैर्य ठेवा! आज प्रत्येक महिलेसाठी कायदे आहेत, पोलीस आहेत, न्यायालय आहे, महिला आयोग आहे, समाजातील अनेक जागृत घटक आहेत — आणि हो, संपूर्ण मीडिया तुमच्या पाठिशी आहे.
“रडतोयस काय वेड्या? लढण्यात शान आहे!” — हे शब्द फक्त घोषवाक्य नसून, प्रत्येक मुलीच्या मनात कोरले गेले पाहिजेत. कारण जगणं हेच एक क्रांती आहे. वैष्णवी हगवणे, वैष्णवी माने — या दोघींच्या वेदना आता इतर कोणत्याही वैष्णवीच्या वाट्याला येऊ नयेत, हाच आपल्यासाठी प्रश्न आहे, आणि हाच आपला संकल्प असायला हवा.
मुलींनो – घाबरू नका, झुकू नका, मरू नका!
लढा… जिंका… आणि समाज बदलून दाखवा! – ॲड.डाॅ.बाबूराव हिरडे, करमाळा.मो.न 9423337480
संबंधित बातम्या
✿ विवाहितेच्या आत्महत्येप्रकरणी पती आणि सासूला दोन दिवसांची पोलीस कोठडी
✿ विवाहितेची गळफास घेवून आत्महत्या – करमाळा शहरातील घटना






