कर्तव्याची जाण आणि माणुसकीचे भान देणारा अनुभव..

करमाळा शहरातील शिवसेनेचे शहरप्रमुख संजय शीलवंत यांना नुकताच एक विलक्षण आणि मन हेलावून टाकणारा अनुभव आला. हा अनुभव फक्त त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील नव्हता, तर तो समाजाला माणुसकीची नवी जाणीव करून देणारा ठरला आहे.
संजय शीलवंत यांचे एकेकाळी करमाळ्यात साडी विक्री व इलेक्ट्रॉनिक्सचे दुकान होते. मात्र, त्यांनी पंधरा वर्षांपूर्वी हे व्यवसाय बंद केले, एवढेच नाहीतर ज्यांच्याकडे काही थकीत रक्कम होती, ती मागायची सुद्धा त्यांनी पूर्णतः बंद केली.

असे असताना गेल्या आठवड्यात त्यांना एक अनपेक्षित फोन आला. चांदभाई शेख नावाच्या व्यक्तीने त्यांना संपर्क करून भेटायची इच्छा व्यक्त केली. शीलवंत यांना थोडे आश्चर्य वाटले. कारण नाव ओळखीचं नव्हतं. तरीही,त्यांनी “या भेटायला” असे सांगितले.

त्यानंतर निलंगा येथून चांदभाई शेख त्यांची पत्नी अब्दुल रब्बानी व आणखी काही मित्रांसह शीलवंत यांच्या घरी आले. शीलवंत यांनी विचारलं – “काय काम आहे?” तेव्हा चांद भाई म्हणाले, “मी पंधरा वर्षांपूर्वी तुमच्या दुकानातून काही वस्तू घेतल्या होत्या. त्या उधारीचे १३,००० रुपये बाकी आहे. ती रक्कम आज तुमच्याकडे द्यायला आलो आहे.” असे म्हणून त्यांनी ती रक्कम समोर ठेवली. त्यानंतर श्री.शीलवंत यांनी थक्क होत उत्तर दिलं – “माझं दुकान बंद होऊन अनेक वर्षे झाली आहेत. मी आता कुणाकडची उधारी घेत नाही, तुमची पण रक्कम नको.” पण चांद भाईंचा आग्रह अधिक होता. ते म्हणाले, “तुम्ही तुमचं काम सोडलं असेल, पण माझ्या धर्मानुसार मी उधारी ठेवून हाजयात्रेला जाऊ शकत नाही. देवाकडे जायचं असेल तर मन शुद्ध हवं, आणि माझं मन तेव्हाच शांत होईल जेव्हा तुमचं देणं फेडेन. कृपया हे पैसे घ्या.”

या प्रसंगाने शीलवंत यांना काय बोलावे हे समजले नाही, सौ. शुभदा शिलवंत यांच्या डोळ्यांत अश्रू उभे राहिले. एकीकडे व्यापार बंद, व्यवहार संपलेला – तरी इतक्या वर्षांनंतर कोणीतरी इतकं सजगपणे कर्ज फेडायला येतं, ही बाब नक्कीच दुर्मिळ. त्या क्षणी धर्म, जात, व्यवसाय, काळ यापलीकडे जाऊन ‘माणूस’ या संकल्पनेचा खरा अर्थ त्यांनी अनुभवला.

श्री. शीलवंत यांनी चांद भाईचा आग्रह मान्य करत रक्कम स्वीकारली. यावेळी सौ. शिलवंत यानी आम्ही ही रक्कम संसारात खर्च करणार नाही. आम्ही आमरनाथ यात्रेला जावू त्याचवेळी ही रक्कम खर्च करू असे म्हणून ते पैसे देव्हार्यावर ठेवले.

या प्रसंगाने साऱ्या समाजात एक सकारात्मक संदेश गेला – की धर्म वेगळे असले, तरी माणसातली माणुसकी, संस्कार आणि प्रामाणिकपणा हे एकच असतात.
हा प्रसंग आपल्या सर्वांसाठी प्रेरणादायक आहे – की व्यवहार संपले तरी चांगुलपणा, जबाबदारीची जाण, आणि माणुसकीचे नाते कायम राहिले पाहिजे. हीच खरी आपल्या देशाची ओळख आहे – विविधतेत एकता, आणि प्रत्येक धर्मात निहित असलेला कर्तव्यनिष्ठेचा गाभा आहे.
📌 संकलन: सतीश काकडे, सावंत गल्ली, करमाळा

