सर्जनशील कवी – प्रकाश लावंड

“उगमस्थळीच असतो झरा,
वाटेवरती गंध पसरतो,
कधी शब्दात, कधी मातीवर
जीवनाचा मंत्र उलगडतो…”
माणूस कोणत्या घरात जन्मतो यापेक्षा, तो आपल्या आयुष्याच्या वाटचालीत स्वतःचे व्यक्तिमत्त्व कोणते ठरवतो, हे अधिक महत्त्वाचं असतं. आदरणीय प्रकाश तात्या लावंड हे असेच एक नाव… जिथे वडिलोपार्जित लौकिक आणि स्वकष्टाचा ‘प्रकाश’ समसमान झळकतो…
करमाळा तालुक्यातील नावाजलेल्या आणि राजकीय प्रभाव असलेल्या घराण्यात जन्मूनही, तात्यांनी वैयक्तिक जडणघडण, शिक्षण, नोकरी, शेती, साहित्य आणि समाजकार्य या सर्वच क्षेत्रांमध्ये आपली ठसठशीत ओळख निर्माण केली.
“जिथे रूततो तिथे फुलवतो”, ही म्हण तात्यांच्या जीवनावर अगदी फिट बसते. करमाळ्याच्या मातीत शिक्षण घेऊन ,सुरुवातीला बँकेत नोकरी केली. सुरळीत वाटचाल करत असतानाही तात्यांनी मातीशी नातं जपलं. एक दिवस हे नातं इतक सशक्त झालं की,मातीच्या ओंजळीत सुखाचं स्वप्न शोधण्यास सुरुवात केली. पण शेतीनेही परीक्षाच घेतली… दुष्काळ, अवकाळी पाऊस, बाजारभावाचे चढ-उतार – सगळं काही आले. तरीही हार न मानता,प्रयत्न सुरूच ठेवले.
तात्यांनी एकाच गोष्टीत माघार घेतली नाही – ती म्हणजे मुलांच्या शिक्षणात आणि संस्कारात. प्रा. डॉ. दिग्विजय हे विद्यावचस्पती आहेत, कन्या प्रा. सौ.अनुराधा काकडे या ही प्राध्यापिका आहेत.
या कामी त्यांना त्यांच्या पत्नी सौ स्नेहलता ( माई ) यांची कणखर आणि खंबीर साथ मिळाली. खरं तर “अडचणींना झुगारून उभं राहतं ते खरं पालकत्त्व असते. ते त्यांनी सिद्ध केलं आहे. तात्यांची खरी ओळख उलगडते ती त्यांच्या कवितांमधून…
“शब्दांच्या मशागतीतून
भावना पेरतात तात्या
आणि जीवनाची फळं
रसाळ कवितेत उमटतात!”
‘काडवान’ हा त्यांचा कवितासंग्रह म्हणजे केवळ शब्दांची आरास नाही, तर शेतीच्या जखमांवरून उमटलेली एक दर्दभरी अनुभूती आहे. त्यात शेतकऱ्याच्या व्यथा आहेत,कथा आहेत, त्याची कळकळ आहे, आणि आशाही आहे.
काडवान ला बार्शी येथील “कालिदास पुरस्कार” मिळालेला आहे. साहित्यिक मान्यता म्हणजे त्यांच्या प्रतिभेचं एक सन्मानचिन्ह आहे. करमाळा तालुका साहित्य मंडळाचे अध्यक्ष म्हणून तात्यांनी “कवितेला गावगावात पोहचवण्याचे जे प्रयत्न केले आहेत, ते शब्दशः आदर्शवत आहेत.” अनेक नव्या कवींना, कवियत्रींना त्यांनी व्यासपीठ दिलं, प्रोत्साहन दिलं आणि योग्य दिशा दिली.
“आपण फुलवलेली माणसं,
हेच खरं आयुष्याचं पीक असतं.”
तात्यांचं व्यक्तिमत्त्व एकसंध नाही – ते अनेक पैलूंनी झळकणारं आहे. त्यांना तुम्ही कधी भजनात पहाल, कधी प्रवचनात ऐकाल, तर कधी एखाद्या शेतकरी मेळाव्यात भाषण देताना सापडतील. त्यांच्या बोलण्यात एक आत्मीयता आहे – जी थेट हृदयाला भिडते.
तात्यांच्या मित्रपरिवारात ते सल्लागार, मार्गदर्शक, आणि हक्काचा आधार बनून राहतात. “ज्यांच्या शब्दांत ऊब असते, अशा माणसांनीच समाज तापलेला असतो…”१४ जुन ला तात्यांचा ६९ वा वाढदिवस, तो साजरा करताना, या बाबी आठवतात त्याचा आम्हाला अत्यंत अभिमान वाटतो.
“वयाचं काही घेणंदेणं नाही
ज्याचं मन तरुण, तोच खरा हिरवा!
तात्यांनी शब्दांचा शेत घडवला
आणि माणसांच्या मनात आपुलकीचं पीक पेरलं…”
आम्ही परमपवित्र पांडुरंग चरणी हीच प्रार्थना करतो
आपण असेच आरोग्यदायी, साहित्यसंपन्न, शेतकरीस्नेही आणि समाजप्रेरक जीवन जगत राहा.
आपल्या काव्यजगतातून आणि कृतीतून आमच्यासारख्या अनेकांना दिशा देत राहा. शतशः शुभेच्छा! आपल्या पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा!
– डाॅ.ॲड. बाबूराव हिरडे, करमाळा.मो.न 9423337480





