करमाळ्यात बच्चू कडूंच्या समर्थनार्थ रस्त्यावर एल्गार

केम(संजय जाधव): प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते आणि माजी मंत्री बच्चुभाऊ कडू यांच्या विविध मागण्यांसाठी सुरू असलेल्या अन्नत्याग आंदोलनाचा आज सातवा दिवस असून त्यांच्या तब्येतीमध्ये गंभीर बिघाड झाला आहे. काल सकाळी त्यांना रक्ताची उलटी झाली असून वजनातही पाच किलो घट झाली आहे. या पार्श्वभूमीवर राज्यभरात तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.

बच्चु कडू यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी करमाळा येथे प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. टेंभुर्णी- अहिल्यानगर रस्त्यावर करमाळा बायपास येथे हे आंदोलन झाले. प्रहारचे तालुकाध्यक्ष संदीप तळेकर यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन पार पडले.


या आंदोलनाला बहुजन शेतकरी संघर्ष समिती, सकल मराठा समाज (मनोज जरांगे पाटील गट), शिवसेना (उद्धव ठाकरे गट), रासप, राष्ट्रवादी काँग्रेस, संभाजी ब्रिगेड, मराठा सेवा संघ, रयत क्रांती संघटना, बळीराजा शेतकरी संघटना, स्वाभिमानी शेतकरी संघटना अशा विविध पक्ष-संघटनांनी पाठिंबा दिला. तसेच परिसरातील अनेक गावांतील ग्रामपंचायतीचे सरपंचही सहभागी झाले होते.

आंदोलनादरम्यान शासनाच्या विरोधात तीव्र घोषणाबाजी करण्यात आली. आंदोलनकर्त्यांनी आपल्या भाषणांतून तीव्र संताप व्यक्त केला. त्यांनी इशारा दिला की, “जर १४ जूनपर्यंत कडू यांच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत, तर हे आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल. आज आमचा मार्ग गांधीगिरीचा असला, तरी भगतसिंग आमच्या मनात आहे.”
कडू यांच्या प्रमुख मागण्या:
- शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी
- शेतमालाला हमीभाव
- दुधाला ४० रुपये दर
- विधवा व निराधार महिलांना ४००० रुपये मानधन
- दिव्यांग नागरिकांना ६००० रुपये मानधन

या आंदोलनास प्रहारचे जिल्हाध्यक्ष दत्ता मस्के पाटील, तालुकाध्यक्ष संदीप तळेकर, शेतकरी कामगार संघर्ष समितीचे दशरथ कांबळे, शिवसेना महिला जिल्हाध्यक्ष आशाताई टोणपे, शाहूदादा फरताडे, संजय शिंदे, राजकुमार सरडे (रयत क्रांती), बापू तळेकर (प्रहार), अतुल निर्मळे (संभाजी ब्रिगेड), सचिन काळे (मराठा सेवा संघ), प्रवीण हांनपुडे (स्वराज्य संघटना), उदय देशमुख (मनोज जरांगे पाटील गट), अमोल घुमरे, डॉ. जमीर सय्यद, स्वातीताई गोरे, विकी मोरे, सोमनाथ जाधव, सागर पवार, नामदेव पालवे, संतोष कुंभार, बाळासाहेब काळे, जमीर सय्यद, अण्णासाहेब रुपनवर, अमित जागते, शहाजी धेंडे, अच्युत पाटील, सागर कुर्डे, काका पारखे, विजयसिंह ओहोळ, सचिन तळेकर, बालाजी अवताडे, अशोक वीर, पप्पू टापरे, भाऊ मांढरे, तुषार ढवळे, आणि अन्य शेतकरी व कार्यकर्ते उपस्थित होते.

करमाळ्यातील हे आंदोलन शिस्तबद्ध आणि संघटित पद्धतीने पार पडले. बच्चू कडू यांच्या आंदोलनामुळे राज्य शासनावर दडपण वाढत आहे. आंदोलनाचे पडसाद येत्या काळात अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे.



