आरोग्याला घातक डीजे व लेझर लाईटवर बंदीची मागणी

करमाळा(दि.२७): करमाळा शहर व तालुक्यातील धार्मिक, सामाजिक, राजकीय व जयंतीच्या मिरवणुका तसेच लग्नसोहळ्यांमध्ये खुलेआम डीजे वाद्यांचा वापर वाढत असून ती प्रतिष्ठेची बाब बनली आहे. या पार्श्वभूमीवर ध्वनीप्रदूषणामुळे मानवाचे आरोग्य व पर्यावरण धोक्यात येत असल्याचे सांगून डीजेवर तात्काळ बंदी घालावी, अशा मागणीचे निवेदन अखिल भारतीय ग्राहक पंचायतीच्या शिष्टमंडळाने उपविभागीय पोलीस अधिकारी अंजना कृष्णा व्ही.एस. यांना दिले.

निवेदनात म्हटले आहे की, करमाळा परिसरात डीजे, लाऊड स्पीकर व लेझर लाईटचा सर्रास वापर होत असून यामुळे नागरिकांचे आरोग्य बिघडत आहे. डीजेच्या कर्णकर्कश आवाजामुळे हृदयविकाराचे झटके येऊन मृत्यू झाल्याच्या घटनाही घडल्या आहेत. तसेच लेझर लाईटमुळे डोळ्यांवर परिणाम होऊन अंधत्व येण्याचे प्रकारही समोर आले आहेत. निवासी क्षेत्र, दवाखाने, शाळा-महाविद्यालयांमध्येही नियम मोडून डीजे वाजवले जात असल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला.

सर्वोच्च न्यायालयाने ठरवून दिल्याप्रमाणे निवासी क्षेत्रात दिवसा ५५ व रात्री ४५ डेसिबल, तर शांतता क्षेत्रात दिवसा ५० व रात्री ४० डेसिबलपेक्षा जास्त आवाजात डीजे अथवा लाऊडस्पीकर वाजवणे प्रतिबंधित आहे. मात्र या नियमांची पायमल्ली होत असून लहान मुलांच्या दवाखान्याजवळही तब्बल पाच तास डीजे वाजवून रुग्णांचे आरोग्य धोक्यात आणल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
शरीरावर परिणाम - तज्ञांच्या मते,कानातील एक महत्त्वाची नस थेट हृदयाशी जोडलेली असते. मोठ्या आवाजामुळे ही नस सतत उत्तेजित होते आणि त्यामुळे हृदयाची गती असामान्यरीत्या वाढते. अशा परिस्थितीत आकस्मिक झटका येण्याचीही शक्यता निर्माण होते. आवाज 85 डेसिबलपेक्षा जास्त झाल्यास गर्भवती महिला, जेष्ठ नागरिक आणि लहान मुले यांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होतात. पेशींना इजा होणे, भोवळ येणे, रक्तदाब वाढणे, कानाच्या नसांवर ताण येणे आणि हृदयाची गती वाढणे यांसारखे त्रास निर्माण होतात.

ग्राहक पंचायतीने केलेल्या मागण्या :
- धार्मिक, सामाजिक, राजकीय कार्यक्रम व लग्नसोहळ्यात डीजे वापरणाऱ्यांवर गुन्हे दाखल करावेत.
- डीजेचे साहित्य जप्त करावे.
- निवासी व शांतता क्षेत्रात ध्वनी मोजण्यासाठी यंत्र बसवून नियमभंग करणाऱ्यांवर कारवाई करावी.
- रात्री १० नंतर लाऊडस्पीकरवर बंदी घालावी.
- तक्रार व कारवाईसाठी पोलिसांनी हेल्पलाईन सुरू करावी.

या निवेदनावेळी जिल्हा महिला आघाडी अध्यक्षा माधुरी परदेशी, माजी मुख्याध्यापिका निलिमा पुंडे, मंजिरी जोशी, ललिता वांगडे, प्रा. भीष्माचार्य चांदणे, संजय हांडे, ब्रह्मदेव नलवडे, अजीम खान, शिवाजी वीर, चक्रधर पाटील, सुमित परदेशी आदी पदाधिकारी उपस्थित होते.
“नियमाचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक व फौजदारी कारवाई करण्यात येईल. नागरिकांनी पोलिसांशी संपर्क साधून सर्व उत्सव व कार्यक्रम शांततेने व नियमानुसार पार पाडावेत, अन्यथा कडक कारवाई टाळता येणार नाही.” – अंजना कृष्णा, उपविभागीय पोलीस अधिकारी
नुकत्याच पार पडलेल्या दहीहंडी उत्सवासाठी करमाळा शहरात ६ ते ७ डीजे आले होते. त्यांनी शहर दणाणून सोडले होते.त्याचबरोबर डोळ्याला घातक अशा लेझर लाईटचा वापर करण्यात आला. आमचा सण वर्षातून एकदाच येतो दणक्यात साजरा झालाच पाहिजे असे म्हणून काही उत्साही मंडळी डीजेचा आग्रह धरतात. परंतु वर्षात अनेक सण, जयंती, लग्न व विविध कार्यक्रमात याचा सर्रास वापर होत आहे. आवाजाची मर्यादा ओलांडून देखील राजकीय दबावामुळे पोलीस डीजेकडे कानाडोळा करत असल्याचा आरोप नागरिक करत आहेत.

करमाळ्यात डीजे-मुक्त गणेशोत्सवाचे पोलिसांचे आवाहन – लोकमान्य टिळक मंडळाचा पुढाकार
येणारा गणेशोत्सव डीजे-मुक्त पद्धतीने साजरा करावा तसेच आवाजाच्या मर्यादांचे उल्लंघन होऊ नये, अशा सूचना उपविभागीय अधिकारी कृष्णा अंजना आणि पोलीस निरीक्षक रणजीत माने यांनी शांतता समितीच्या बैठकीत केल्या होत्या.
या आवाहनाला प्रतिसाद देत करमाळ्यातील लोकमान्य टिळक तरुण मंडळ यांनी यंदा डीजे-मुक्त गणेशोत्सव साजरा करण्याची घोषणा केली आहे. आधीच एडव्हान्स दिलेला डीजे रद्द करून बँजोचा पर्याय स्वीकारल्याची माहिती मंडळाच्या वतीने देण्यात आली. मंडळाच्या या निर्णयाचे शहरात स्वागत होत असून इतर मंडळांनीही हा आदर्श घेत पारंपरिक वाद्यांसह आरोग्यपूरक आणि सांस्कृतिक वातावरणात उत्सव साजरा करावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

