करमाळ्यातील विविध प्रश्नांवर युवक काँग्रेसचे आंदोलन – प्रशासनाचे लेखी आश्वासन

करमाळा: शहरातील विविध प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी करमाळा तालुका युवक काँग्रेसचे अध्यक्ष साहेबराव वाघमारे यांनी 22 ऑगस्ट रोजी बेमुदत साखळी उपोषण सुरु केले होते. मात्र नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांनी आंदोलनस्थळी उपस्थित राहून सर्व मागण्या पूर्ण करण्याबाबत लेखी आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन स्थगित करण्यात आले आहे.

शहरातील विस्कळीत व दूषित पाणीपुरवठा, तुंबलेल्या गटारींमुळे पसरणारी रोगराई, निकृष्ट दर्जाचे डांबरीकरण, अपुरा कर्मचारी वर्ग, मोकाट श्वानांचा सुळसुळाट, तसेच भाजी मंडईचे कमकुवत पत्राशेड या प्रश्नांबाबत वाघमारे यांनी नगरपरिषद प्रशासनाकडे निवेदन दिले होते.

उपोषणाला सुरुवात होताच नगरपरिषदेचे मुख्याधिकारी आंदोलनस्थळी दाखल झाले आणि सर्व मागण्या पूर्ण करण्याबाबत लेखी आश्वासन दिले. त्यानंतर हे आंदोलन स्थगित करण्यात आले. मात्र, प्रशासनाने काही दिवसांत मागण्या पूर्ण केल्या नाहीत तर पुन्हा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी दिला.

या उपोषणाला तालुका काँग्रेसचे अध्यक्ष प्रतापराव जगताप यांचे मार्गदर्शन लाभले. यावेळी प्रतापराव जगताप, साहेबराव वाघमारे, सुजय जगताप, देवराव सुकळे, संतोष वारे, शंभूराजे फरतडे आणि संदीप तळेकर आदी उपस्थित होते.


