उत्तरेश्वर देवस्थानचा पालखी सोहळा उत्साहात संपन्न
केम (प्रतिनिधी-संजय जाधव) : केम (ता.करमाळा) येथील जागृत ग्रामदैवत श्री उत्तरेश्वर देवस्थानचा पालखी सोहळा नुकताच मोठ्या उत्साहात पार पडला.श्रावणी सोमवार निमित्त सालाबाद प्रमाणे पालखी काढायची प्रथा आहे. दि.१ ऑगस्ट रोजी पहाटे साडेपाच वाजता श्री उत्तरेश्वर आरती करण्यात आली.
पहाटेपासून श्रीच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. आलेल्या हजारो भाविकांना मंदिर समिती तर्फे मसाला दूध वाटप करण्यात आले. सकाळी साडेआठ वाजता शिवलिंगला फूल वाहण्यात आले.
यावेळी “हर हर महादेव”, “उत्तरेश्वर महाराज की जय” अशी गर्जना भाविकांनी केली. त्यानंतर पालखी सोहळ्याची तयारी करण्यात आली. या पालखी सोहळ्याचा मान दौंड बंधूला आहे. यावेळी दौंड बंधूकडून पालखीची सजावट करण्यात आली. त्यानंतर या पालखीची आरती केली गेली व पालखी सोहळ्याला सुरुवात झाली.
या पालखी सोहळ्यामध्ये सैराट हलगी पुट्टा बँड, तुताऱ्या अशी वाद्य होती. “बोला हर हर महादेव”, “श्री उत्तरेश्वर महाराज की जय” अशा नामघोषाने संपूर्ण केम नगरी दुमदुमून गेली होती. छबीन्याच्या मार्गावरून पालखी सोहळा सुरू झाला. पालखीच्या दर्शनासाठी भाविकांनी जागोजागी गर्दी केली होती. संपूर्ण पालखी मार्गावर ठिकठिकाणी महिलांनी रांगोळ्या काढल्या होत्या.
या पालखी सोहळ्यात लहानापासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत अनेक भाविक सहभागी झाले होते. व्यापारी वर्गाने आपली दुकाने बंद करून, पालखी सोहळ्यात सहभागी झाले होते. पालखी सोहळ्यातील भाविकांना ग्रामस्थांच्या वतीने मसाला दूध,चहा यांचे वाटप करण्यात आले.
उत्तरेश्वराच्या पालखीने गावातील सर्व बंधुना भेट दिली. या मध्ये दक्षिणेश्वर, केमेश्वर,मदनेश्वर,बसमेश्वर आदींना भेट दिली. ही मिरवणूक तब्बल सह तास चालली. साडे तीन वाजता पालखी सोहळा मंदिरात पोहचला. त्यानंतर श्री ऊत्तरेश्वर बाबाची आरती झाली त्यानंतर आलेल्या पालखी सोहळ्यातील सर्व भाविकांना महाप्रसाद म्हणून शाबूचे वडे वाटप करण्यात आले.या पालखी सोहळ्यात श्री ऊत्तरेश्वर देवस्थान ट्रस्टचे सर्व सदस्य महंत जयंतगिरी महाराज आदीजन ऊपस्थित होते.