करमाळ्यात नागपंचमी उत्साहात – तरुणांनी गाण्याच्या तालावर उडविले पतंग – नागोबा मंदिर यात्रेत भाविकांची गर्दी
करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा : करमाळा शहर व तालुक्यात दरवर्षीपेक्षा यावर्षी नागपंचमीचा सण मोठ्या उत्साही वातावरणात साजरा करण्यात आला. कोरोनामुळे गेल्या दोन वर्षांपासून सण उत्सवाला परवानगी नसल्याने, कोणत्याही स्वरूपाचे उत्सव किंवा मंदिरे उघडली नव्हती, त्यामुळे अनेक यात्रा बंद होत्या. त्यामुळे गेल्या दोन वर्षांपासून पंचमीनिमित्ताने नागोबा मंदिरात भरत असलेली यात्रा बंद होती, परंतु यावर्षी मात्र मोठ्या उत्साही वातावरणात यात्रा व मंदिरे नागरिकांनी फुलून गेले होते.
करमाळा शहरात आज (ता.२) दिवसभर लहान मुलांपासून मोठ्या तरुणांनी आपापल्या घराच्या गच्चीवर आपल्या मित्रांसोबत डिजे गाण्याच्या तालावर पतंग उडविण्याचा आनंद लुटला, करमाळा शहर दिवसभर गाण्यामुळे अगदी दुमदुमले होते. नागपंचमीनिमित्ताने शहरातील कर्जत रोडवरील नागोबा मंदिरात दरवर्षी यात्रा भरवली जाते. याप्रसंगी नागोबाची आरती करून नागोबा प्रतिमेची मिरवणूक काढण्यात आली. सायंकाळी याठिकाणी मंदिर परिसरात मोठी यात्रा भरली होती. भाविकांची प्रचंड गर्दी पहायला मिळाली. याठिकाणी लहान मुलांना खेळणी पासून खाद्यपदार्थ असे विविध स्टॉल लावलेले होते. त्यामुळे लहानांपासून मोठ्यापर्यंत या यात्रेत गर्दी होती. याठिकाणी करमाळा पोलिसांनी वाहनांना योग्य पार्किंग करून भाविकांसाठी चोख बंदोबस्त ठेवला होता.