नेरले येथील पावसाची भाकणूक
करमाळा तालुक्यातील नेरले गावात मारुतीचे मंदिर आहे या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे या ठिकाणी दोन हनुमंताच्या मूर्ती आहेत. यामुळे या मंदिराचं एक वेगळेपण दिसून येते. श्रावण महिन्यात मारुतीच्या मंदिरामध्ये सप्ताह असतो. या ठिकाणी रोज रात्री कीर्तन-भजनाचे कार्यक्रम होत असतात . सप्ताहाच्या शेवटच्या दिवशी पावसाची भाकणूक केली जाते.
या कार्यक्रमासाठी तालुक्यातील अनेक लोक हजेरी लावतात. या दिवशी दोन लहान मुलांना वस्त्र न घालता समोरासमोर उभे केले जाते व दोघांच्या बाजूनी बांबूच्या कांबि लावल्या जातात. इथून पुढील नक्षत्रामध्ये पाऊस असेल तर सीता जुळाव्यात, नसेल तर फुलगाव्यात अशी विचारणा केली जाते त्यानुसार ज्या नक्षत्रामध्ये पाऊस आहे त्यावेळेस त्या बांबूच्या कांबी एकमेकाला मिळतात जर पाऊस नसेल तर त्या परस्परांपासून दूर होतात अशा पद्धतीचे भाकित वर्तविले जाते.
ही परंपरा फार वर्षापासून चालू आहे आणि तो अंदाज जवळजवळ 90 टक्के सत्य होतो. विज्ञान युगात देखील लोकांची श्रद्धा आहे. नेरले गावामध्ये यावर्षी श्रावण महिन्याच्या तिसऱ्या शनिवारी म्हणजेच उद्या दिनांक १३ ऑगस्ट रोजी हा कार्यक्रम होणार आहे तरी तालुक्यातील भाविकांनी या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहावे . दुसऱ्या दिवशी रविवारी महाप्रसादाचा कार्यक्रम असतो आणि कार्यक्रमाची सांगता होते.
- डॉ.धनंजय पन्हाळकर, नेरले ( सध्या देवगड) मो. ९४२३३०३७६८