सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्त्यांनी जास्तीत जास्त रक्तदान शिबिरे घेवून राष्ट्रीय एकात्मता जपावी – माजी मंत्री बच्चू कडू
करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा : ज्यावेळेस एखाद्या रुग्णाला रक्ताची गरज भासते, त्यावेळेस रक्ताची किंमत कळते, एका रक्ताच्या पिशवीमुळे एका रुग्णाचे प्राण वाचू शकतात, एवढी ताकद रक्तदानात आहे, यामुळे सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्त्यांनी जास्तीत जास्त रक्तदान शिबिरे घेऊन राष्ट्रीय एकात्मता जपण्यासाठी प्रयत्न करावेत असे आव्हान माजी मंत्री आमदार बच्चू कडू यांनी केले.
पुढे बोलताना ते म्हणाले की, हिंदूंच्या रक्तामुळे मुसलमानाचे प्राण वाचते मुसलमानाच्या रक्तामुळे एखाद्या मागासवर्गीयाचे प्राण वाचते, दलिताच्या रक्तामुळे सुवर्ण समाजातील लोकांचे प्राण असते, यातच खरी राष्ट्रीय एकात्मता आहे असेही त्यांनी याठिकाणी नमूद केले.
करमाळा येथे स्वातंत्र्यसैनिक मनोहर पंत गणपत चिवटे मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल संचलित श्वास फाउंडेशनच्या माध्यमातून सुरू केलेल्या श्री कमला भवानी ब्लड बँकेचे उद्घाटन आमदार बच्चू कडू व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे स्वीक सहाय्यक मंगेश चिवटे यांच्या हस्ते झाले.
यावेळी बोलताना स्वातंत्र्यसैनिक मनोहरपंत चिवटे मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटलचे संचालक महेश चिवटे म्हणाले की लवकरात लवकर डायलिसिस सेंटर उभा करण्याचे आमचे स्वप्न असून जेणेकरून डायलिसिस साठी रुग्णांना बाहेर गावी जावे लागणार नाही, रक्तदान शिबिरे आयोजित करणाऱ्या सामाजिक राजकीय संस्थांना त्यांच्या शिफारसीनुसार गरजू गरीब रुग्णांना मोफत रक्त देण्याची व्यवस्था करणार असल्याचे सांगितले. यावेळी व्यवस्थापक निलेश पाटील यांनी आभार मानले.