जेऊर येथे आयोजित "फिरते लोकअदालत" मध्ये ८ प्रकरणे निकाली - Saptahik Sandesh

जेऊर येथे आयोजित “फिरते लोकअदालत” मध्ये ८ प्रकरणे निकाली

करमाळा / संदेश प्रतिनिधी :

करमाळा (ता.२६) : जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सोलापूर व तालुका विधी सेवा समिती, करमाळा यांच्या संयुक्त विद्यमानाने “फिरते लोकअदालत” चे ग्रामपंचायत कार्यालय परिसर, जेऊर (ता.करमाळा) येथे आयोजन करण्यात आले. या “फिरते लोकअदालत” मध्ये एकूण 5 दिवाणी व 3 फौजदारी अशी एकूण 8 प्रकरणे निकाली निघाली. सदर लोकअदालत जिल्हा व सत्र न्यायधीश एस.ए.ए.आर औटी तसेच करमाळा न्यायालयालयाच्या मुख्य न्यायाधीश सौ.मिना एखे यांचे मार्गदर्शनाखाली आणि करमाळा न्यायालयाचे सहदिवाणी न्यायाधीश आर.ए.शिवरात्री यांचे अध्यक्षतेखाली संपन्न झाले.

कायदेशीर विविध विषयांवर करमाळा वकील संघाचे अध्यक्ष व्ही.एस.जरांडे, सचिव ॲड.योगेश शिंपी, ॲड.श्री. राखुंडे, ॲड.पी.के.पवार यांनी मार्गदर्शन केले. तसेच विधिज्ञ ॲड.अमर शिंगाडे, ॲड.चौधरी, ॲड.सौ.सय्यद, ॲड.कु.शिंदे, ॲड.कु.जाधव ॲड.मनोजकुमार कांबळे, यांनी सहभाग घेऊन लोक अदालतमध्ये प्रकरणे निकाली काढण्यास मदत केली.

सदर कार्यक्रमामध्ये अध्यक्षीय भाषणात सह. दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी आर.ए. शिवरात्री यांनी उपस्थितांना कायदेविषयक साक्षरते बाबत तसेच मध्यस्थी व लोक अदालत बाबत मार्गदर्शन केले. सदर फिरते लोक अदालत मध्ये एकूण 5 दिवाणी व 3 फौजदारी अशी एकूण 8 प्रकरणे निकाली निघाली. न्यायालयीन स्टाफमध्ये आर.पी.खराडे, श्री.मराळ, श्री.एम.के.कुंभार,श्री.के.एल. माने, एस.बी.सरक उपस्थित होते. या सर्व नियोजनाचे मार्गदर्शन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव नरेंद्र जोशी यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!