५० हजारांचा ऐवज असलेली सापडलेली बॅग प्रामाणिक पणे केली परत
केम( प्रतिनिधी-केम ) केम (ता. करमाळा) येथील अनिल तळेकर यांनी देवीचे दागिने व पाच हजार रुपये रोख रक्कम असलेली बॅग सापडल्यानंतर प्रामाणिकपणे मंडळाकडे जमा केली. याबद्दल त्यांचे केम परिसरतुन त्यांचे कौतुक केले जात आहे.
याची सविस्तर माहिती अशी कि येथील गांधी चौकात नवरात्रात देवी बसवेश्वर मंदिरात बसवतात. पौर्णिमे दिवशी मंडळाचे कार्यकर्ते सचिन ओस्तवाल व इतर कार्यकर्त्यांनी देवीचे दागिने काढले. या मध्ये चांदिचा टोप, कंबर पट्टा गंठण व पाच हजार रुपये रोख हे सर्व एका बॅग मध्ये भरले. देवी मंदिराशेजारी ओस्तवाल यांचे जनरल स्टोअर्स दुकान आहे. तिथे ते बॅग घेऊन दुकानात आले व काम झाल्यानंतर दुकान बंद करताना ही बॅग दुकानाबाहेरील फ्रिज वर राहिली. रात्रभर बॅग तशीच राहिली.
सकाळी अनिल तळेकर नेहेमीप्रमाणे चौकात आले. त्यांना ही बॅग दिसली. या बॅगेत असलेले दागिणे व पाच हजार रुपये असे मिळूण पन्नास हजार रूपयाचा ऐवज पाहून ही बॅग देवीच्या मंदिराची असल्याचे लक्षात आल्यानंतर ती बॅग मंडळाकडे प्रामाणिक पणे परत केली. याबद्दल मंडळाच्या सदस्यांनी त्यांचे आभार व्यक्त करून ऐपी ग्रुपचे अध्यक्ष अच्युत काका पाटिल यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या वेळी रमेश तळेकर, शिवाजी मोळिक, शिवसेना महिला आघाडीच्या अध्यक्षा सौ वर्षा ताई चव्हाण, पांडुरंग तळेकर युवा सेनेचे जिल्हा समन्वयक सागर तळेकर ऊपस्थित होते.