गुरुकुल स्कूलमधील वैष्णवी पाटील हिचे सुयश..
करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा : येथील गुरुकुल पब्लिक स्कूल या शाळेत इयत्ता नववीच्या वर्गात शिकत असलेली धनुर्विद्येतील खेळाडू वैष्णवी पाटील हिने प्रतिकूल परिस्थितीवर मात करत जिद्द आणि चिकाटीने ४२व्या एन.टी.पी.सी. ज्युनियर राष्ट्रीय आर्चरी स्पर्धेत प्रभावी कामगिरी नोंदविली आहे.
वैयक्तिक तीन रौप्य आणि सांघिक कामगिरीत एक सुवर्ण अशी एकूण चार पदके पटकावून करमाळ्यासह सोलापूर जिल्हा आणि राज्याचे नाव देश पातळीवर उंचावले आहे. पणजी येथे नऊ ते अकरा नोव्हेंबर दरम्यान या स्पर्धा पार पडल्या.
यावेळी महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधित्व करणाऱ्या करमाळ्याच्या पाटील हिने हे यश मिळविले. इंडियन बो स्पर्धा प्रकारात एकवीस वर्षे खालील वयोगटात खेळताना तिने चार पदके पटकावली. यामध्ये तीन रौप्यपदके वैयक्तिक प्रकारात मिळविली. तर सांघिक प्रकारात समृद्धी पवार (अरण, ता. माढा) व साक्षी फाटे (नाशिक) यांच्यासह सुवर्णपदक पटकविणारी कामगिरी केली. तिरोडा (गोंदिया) येथे झालेल्या राज्यस्तरीय स्पर्धेतील यशानंतर गोवा राष्ट्रीय स्पर्धेसाठी तिची निवड झाली होती. तिला एकलव्य ॲकॅडमीचे विठ्ठल भालेराव यांचे मार्गदर्शन मिळत आहे.
वैष्णवी पाटील हिने पहिल्याच वर्षी खेळामध्ये उतरून एका वर्षात राज्यस्तरीय स्पर्धेत दोन पदके, आणि राष्ट्रीय स्पर्धेत चार पदके अशी एकूण सहा पदके तिने मिळवलेली आहेत. राष्ट्रीय स्पर्धेत खेळताना तिने 40 मीटर अंतरावरून 360 पैकी 325 गुण मिळून सिल्वर मेडल मिळवले तर 30 मीटर अंतरावरून 360 पैकी 326 गुण मिळून सिल्वर मेडल प्राप्त केले. शिवाय मोडनिंब ची समृद्धी पवार व नाशिकची साक्षी थाटे तिच्यासोबत सांघिक वैष्णवी ने 40 मीटर अंतरावरून गोल्ड मेडल मिळवले.