ट्रान्सफार्मरच्या शॉर्टसर्किटने दोन एकर ऊस जळून खाक – चार लाखाचे नुकसान..
- करमाळा / संदेश प्रतिनिधी
करमाळा : बोरगाव (ता. करमाळा) हद्दीतील पांढरे वस्ती वरील दोन एकर ऊस ट्रान्सफार्मरच्या शॉर्टसर्किटमुळे जाळ होऊन जळून खाक झाला आहे. यामध्ये जवळपास ४ लाखाचे नुकसान शेतकऱ्याचे झाले आहे.
रामदास दामोदर गायकवाड असे शेतकऱ्याचे नाव असून, त्यांनी तहसीलदार समीर माने यांना नुकसान भरपाई बाबत निवेदन दिले आहे. दिलेल्या निवेदनात त्यांनी म्हटले की माझी बोरगाव येथे गट नं. १०/६ मध्ये दोन एकर जमीन असून, त्यामध्ये वीज वितरण कंपनीला तोंडी, वारंवार विनंती केली होती की.. या ट्रान्सफार्मरमुळे माझ्या शेतातील पिकास धोका होण्याची शक्यता आहे.
त्यामुळे ट्रान्सफार्मरची व्यवस्था दुसरीकडे करावी; अशी मागणी केली होती. परंतू याकडे वीज वितरण कंपनीने दुर्लक्ष केले. त्यामुळे २८ नोव्हेंबर रोजी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास या ट्रान्सफार्मवर शॉर्टसर्किट होऊन माझ्या ऊसाचे नुकसान झाले आहे. त्यामुळे माझ्या ऊसाची नुकसान भरपाई मला मिळावी; अशी मागणी शेतकरी रामदास दामोदर गायकवाड यांनी केली आहे.