'सेवक ते उद्योजक' - ज्ञानदेव पुराणे यांचा प्रवास.. - Saptahik Sandesh

‘सेवक ते उद्योजक’ – ज्ञानदेव पुराणे यांचा प्रवास..

मोठी स्वप्नं पाहिल्यानंतर ती स्वप्नं पूर्ण करण्यासाठी निश्चितच वाटचाल करावी लागते. जे लोक योग्य दिशेने वाटचाल करतात आणि कल्पकता व ग्राहकांशी संपर्क ठेवून कायम यशाचं गणित सोडवितात तेच जीवनात काहीतरी करून दाखवतात. अशाचप्रकारे पोथरे येथील ज्ञानदेव पुराणे यांचा प्रवास आहे. ज्ञानदेव पुराणे यांचे वडील पाटबंधारे विभागाकडे यमांडर म्हणून नोकरीला होते. दुर्दैवाने त्यांना व्यसन लागले आणि परिवाराची ससेहोलपट झाली.

ज्ञानदेव पुराणे यांना दोन भाऊ सिताराम पुराणे व संजय पुराणे आहेत. ते दोघेही स्वत:चे व्यवसाय करत आहेत. ज्ञानदेव पुराणे यांना नववीत असतानाच लक्षात आले की, आता काहीतरी काम केल्याशिवाय घर उभा राहणार नाही. त्यामुळे त्यांनी तत्कालीन विना अनुदानित नामदेवराव जगताप विद्यालयात सेवक म्हणून काम सुरू केले. एवढेच नाहीतर जिल्हा बँकेची करणे व पाणी भरणे हे काम सुरू केले. त्यासाठी त्यांना दररोज दहा रू. मिळत होते. याशिवाय सायकल पंक्चर काढण्याचेही दुकान सुरू केले. यातही घराची तजबीज होत नसल्याने त्यांनी २००१ ला फोटोग्राफी व्यवसाय सुरू केला.पोथरे येथे शाखा होती त्या शाखेत मुळातच फोटोग्राफीची आवड असल्याने सुरूवातीला पहिले एक वर्ष बागडे यांच्याबरोबर एकत्र काम केले.

त्यानंतर त्यांनी स्वत: काम सुरू केले. विशेष म्हणजे फोटोग्राफीतील असणारे कौशल्य तसेच पुढे व्हिडीओ शुटींग सुरू केली. त्यातही वेगळेपण असल्याने त्यांना अनेक ऑर्डरी मिळू लागल्या. व्हीडीओ शुटींगचे मिक्सींग तसेच डबींग करण्यासाठी त्यांना अकलुजला जावे लागत होते.

त्यावेळी करमाळ्यामध्ये एका ठिकाणी मिक्सींगचे काम होत होते. परंतू त्यात गुणवत्ता नसल्याने श्री. पुराणे अकलुजला जात होते. दरम्यान संबंधित व्यवसायिकाने पुराणे यांना चिडविले. त्यानंतर पुराणे यांनी जिद्द बांधली व २००९ ला जवळपास अडीच लाख रूपये खर्च करून पोथरे येथे मिक्सींग, डबींग करणारे सॉफ्टवेअर आणले. विशेष म्हणजे कंपनीने जे ट्रेनिंग दिले त्यावरच त्यांनी अनुभवातून अत्यंत चांगल्याप्रकारे कॅसेट देण्याचा व्यवसाय सुरू केला. त्यामुळे त्यांना कर्जत, जामखेड, परांडा, टेंभूर्णी, राशिन, करमाळा तालुक्यातील अनेक ग्राहक येऊ लागले. त्यानंतर त्यांनी मागे पाहिलेच नाही.

या व्यवसायातून त्यांनी आपला स्वतःचा परिवार तर उभा केलाच पण जागा घेऊन सुंदर बंगलाही पोथरे येथे बांधला. याबरोबरच अनेक व्यवसायिकाबरोबर स्वत:चे चांगले संबंध निर्माण करून आजही ते फोटोग्राफी व्हीडीओ शुटींग व मिक्सींग या कामात कायम गुंतून असतात. पुराणे हे व्यवसायाबरोबरच सामाजिक कार्यात अग्रभागी असतात. पोथरे येथील कोणत्याही गरजूंना मार्गदर्शन करणे, ते सांगतील ती सर्व कामे करण्यासाठी प्रयत्नशील असतात. याकामी त्यांना त्यांची पत्नी भाग्यश्री यांचे पूर्ण सहकार्य मिळते.

वडीलांना पेन्शन मिळत होती. परंतू व्यसन आणि आजार यामुळे आमच्या परिवारात अन्य मार्गातून पैसा मिळाल्याशिवाय परिवार चालणे कठीण होते. त्यामुळे मी नववीतून शाळा सोडली, परंतू पुढे आष्टी येथे भगवानबाबा विद्यालयातून १२ वी पर्यंतचे शिक्षण घेतले आहे. दरम्यान वडीलांचे निधन झाले. पुढे माझी आई निलाबाई या सतत आजारी पडत असल्याने तिची सर्व प्रकारची सेवा मला करावी लागली व आजही आनंदाने करत आहे. माझ्या वाटचालीत पत्नी सौ. भाग्यश्री तिचा मोठा वाटा असून माझी मुले यश व सोनाली हे शिक्षण घेत आहेत. पोथरे येथे माझा व्यवसाय उत्तम चालत असलातरी भविष्यात मी करमाळा शहरात याच अनुषंगाने मोठा व्यवसाय सुरू करण्याचे धोरण बाळगून आहे.

…ज्ञानदेव पुराणे ( व्यवसायिक)


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!