उत्तरेश्वर कॉलेज मध्ये अखिल भारतीय साने गुरुजी कथामाला अभ्यास केंद्र सुरू होणार
केम ( प्रतिनिधी /संजय जाधव) – श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर संचलित श्री उत्तरेश्वर ज्युनियर कॉलेज केम या उपक्रमशील संस्कार केंद्रात लवकरच अखिल भारतीय साने गुरुजी कथामाला अभ्यासकेंद्र सुरू करण्याचा निर्णय केला आहे.
दि. 24 डिसेंबर यादिवशी मानवी जीवनाचे उपासक साने गुरुजी यांचा जन्मदिन मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या दिवसाचे औचित्य साधून उत्तरेश्वर ज्युनियर कॉलेज येथील विद्यार्थी आणि प्राध्यापक वर्ग यांनी मिळून हा संकल्प केला आहे.
साने गुरुजी कथामाला ही साने गुरुजींच्या स्मरणार्थ कार्य करणारी बालसंस्कारी चळवळ आहे. परमपूज्य साने गुरुजींच्या पवित्र स्मृती विद्यार्थ्यांच्या ठिकाणी सदैव जागृत ठेवणे, कथाकथन आणि अन्य विधायक , सांस्कृतिक व शैक्षणिक कार्याद्वारे त्यांना राष्ट्राचे भावी नागरिक बनविणे हे या अभ्यास केंद्राचे मुख्य उद्दिष्ट आहे.
साने गुरुजी कथामाला जिल्हा समिती सोलापूर यांच्या वतीने संस्कार वाचन माला परीक्षा देखील घेतली जाते. यातून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण व्यक्तिमत्व विकास साधला जातो. या अभ्यास केंद्रासाठी प्राचार्य श्री सुभाष कदम, प्रा.डॉ.मच्छिंद्र नागरे, प्रा.संतोष साळुंखे, प्रा.संतोष रणदिवे, प्रा.सतीश बनसोडे हे सहकार्य करीत आहेत.