गावकामगार तलाठ्याकडून खंडणी मागणाऱ्याविरूध्द गुन्हा दाखल..
करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा : गावकामगार तलाठ्याकडून खंडणी वसुल करणाऱ्याविरूध्द पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार करमाळा येथे १० जानेवारीला सकाळी अकरा वाजता घडला आहे. या प्रकरणी गावकामगार तलाठी अभिषेक चंद्रकांत काळे यांनी फिर्याद दिली आहे.
त्यात त्यांनी म्हटले आहे, की १० जानेवारीला सकाळी अकरा वाजता बाळासाहेब अनभुले या तलाठ्याने तलाठी कार्यालय, करमाळा येथे भेटण्यासाठी बोलविले. मला सांगितले, की किशोर बापू शिंदे (रा. खांबेवाडी) याच्याकडे तुमचे पैसे घेतानाचे व्हिडीओ आहेत. तो मुलगा मौलालीमाळावर थांबून आहे तर त्याची भेट घ्या.. असे सांगितले. नंतर मी तेथे गेलो असता, त्याने मोबाईलमधून व्हीडीओ क्लिप डिलीट करायची असल्यास सहा लाख रूपये रोख द्यावे लागतील. असे सांगितले. त्याने सदरची क्लिपही दाखवली नाही. नंतर दोन लाख रूपये द्यावे लागतील.. असे सांगितले.
त्यानंतर १३ जानेवारीला पुन्हा दीड लाख रूपये रक्कम देण्यास सांगितले व पोलीसांना अगर कोणास खबर दिल्यास तुला सोडणार नाही.. असा दम दिला. त्यानंतर १२ जानेवारीला दुपारी दोन वाजता किशोर शिंदे याने माझ्या मोबाईल फोनवर व्हॉटस्अप केला व मला दुपारी दोनच्या दरम्यान दीड लाख रूपये घेऊन बाबूकाका यांच्या पेट्रोलपंपावर बोलविले. त्यानूसार १३ जानेवारी ला सकाळी माझ्या खिशामध्ये असलेले ९ हजार ५०० रूपये घेऊन पोलीस ठाणे येथे आलो.
त्यानूसार पोलीसांनी त्याबाबत सापळा रचण्याचे ठरविले. त्यानूसार हिरव्या रंगाच्या कागदाचे एकूण तीन बंडल व पांढऱ्या रंगाचे कागदाचा एक बंडल तयार केला. त्यानूसार पोलीस व पंच व मी असे पेट्रोलपंपावर १३ जानेवारीला साडेअकरा च्या सुमारास गेलो. त्यावेळी पोलीसांनी वेषांतर केलेले होते. दरम्यान किशोर शिंदे हा मला म्हणाला की.. तु दीड लाख रूपये दे नाहीतर व्हीडीओ क्लिप व्हायरल करेल ! त्यानंतर मी ९ हजार ५०० रूपये रोख असलेली रक्कम चार बंडलात किशोर शिंदे यांना दिली व ती खंडणी स्वीकारताना तो पोलीसांना रंगेहाथ सापडला आहे. या प्रकरणी पोलीसांनी खंडणी व धमकीचा गुन्हा किशोर शिंदे याच्याविरूध्द दाखल केला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रविण साने हे करत आहेत.