हिवरवाडी ग्रामपंचायतीने विधवा महिलांसाठी आयोजित केलेला कार्यक्रम स्तुत्य – रश्मी बागल-कोलते
करमाळा (दि.१९) : तालुक्यातील हिवरवाडी ग्रामपंचायतीने आयोजित केलेला ‘विधवा महिला मेळावा व हळदी कुंकू कार्यक्रम’ हा उपक्रम स्तुत्य असून समाजात आदर्श घालणारा आहे असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य साखर संघाच्या संचालिका रश्मी बागल-कोलते यांनी केले. मकर संक्रांतीनिमित्त १६ जानेवारी रोजी हिवरवाडी येथे आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या.
यावेळी पुढे बोलताना त्या म्हणाल्या की, स्त्रियांनी आपल्या पायावर स्वाभिमानाने उभारुन आपल्या कुटुंबातील मुलांवर चांगले संस्कार करून धाडसाने समाजात पुढे येत समाजसेवेसाठी कार्यरत राहिले पाहिजे. सोबतच समाजात आदर्शवत कार्य करण्यासाठी नेहमीच अग्रगण्य राहिले पाहिजे.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी करमाळा येथील महात्मा फुले समाज सेवा मंडळाचे अध्यक्ष व विधवा महिला सन्मान व संरक्षण हक्क कायदा अभियानाचे जनक प्रमोद झिंजाडे हे होते.यावेळी यश कल्याणी सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष गणेश करे-पाटील, बाळासाहेबांची शिवसेनाचे जिल्हा प्रमुख महेश चिवटे, प्रा. प्रदीप मोहिते, पत्रकार प्रा.एन.डी.सुरवसे, पत्रकार विशाल घोलप, हरिश्चंद्र झिंजाडे, सरपंच अनिता पवार, उपसरपंच संभाजी गुळवे, समाधान कडवकर आदि मान्यवर उपस्थित होते.
याप्रसंगी गावच्या ग्रामसेविका श्रीमती जयश्री सुतार यांचा विशेष सन्मान मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी उपस्थित २१ विधवा महिलांनी हळदी कुंकवाचा कार्यक्रम साजरा केला. त्यानंतर त्यांना भेटवस्तू देण्यात आल्या. तसेच २ पुनर्विवाहित महिलांचा पण सन्मान यावेळी झाला आणि १५० महिलांना भेटवस्तू देण्यात आल्या.
यावेळी प्रमोद झिंजाडे म्हणाले की, ‘विधवा स्त्रियांनी सन्मानाने जगण्यासाठी लवकरच असा कायदा राज्य सरकार करत आहे. ही समाधानाची बाब आहे. महिलांनीही आता या परंपरा व रूढींनी झुगारून प्रगतीसाठी सज्ज रहावे’.
या वेळी महेश चिवटे आपल्या भाषणात म्हणाले, झिंजाडे यांनी राबवलेला उपक्रम नक्कीच स्वागतार्ह आहे. याचे अनुकरण प्रत्येकाने स्वतःहून करायला हवे. पूर्वी सती जाण्याची प्रथा होती. माँसाहेब जिजाऊंपासून ती प्रथा मोडीत निघाली. पण आता समाजात मोठे बदल झाले आहेत. तरीही जुन्या प्रथा तशाच आहेत. त्या मोडीत काढल्या पाहिजेत. या कुप्रथांसह समाज आजही स्त्रियांच्या आजाराकडे दुर्लक्ष करतो, ही बाब लक्षात घेऊन मुख्यमंत्र्यांनी स्त्री रोगाचे करून उपचार करण्याचा संकल्प हाती घेतला. यातून आतापर्यंत तीन कोटी तपासणी झाली. पुढे गावोगावी स्त्री रोग निदान शिबिरे राबवली जावीत.
प्रा.मोहिते यांनीही मनोगत व्यक्त केले ते म्हणाले की, ‘राजा राममोहन रॉय यांनी तसेच ताराबाई शिंदे यांनी सतीची प्रथा बंद करण्यासाठी मोठं योगदान दिले आहे. समाजाला घडविण्याची दिशा देण्यासाठी, गावच्या प्रगतीसाठी हा आदर्श हिवरवाडीतील सुप्रिया पवार हिच्यासारख्या विद्यार्थीनीने घालुन दिला आहे’
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक कुमारी सुप्रिया पवार यांनी केले, सूत्रसंचालन चंद्रशेखर जोगळेकर यांनी केले तर आभार सरपंच अनिता पवार यांनी मानले.
यावेळी ग्रामपंचायत सदस्य बापू इरकर, वैशाली इरकर, प्रियंका इवरे, शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष अनिल पवार, गणेश इवरे, सोपान पवार, दत्तू इरकर, आजिनाथ इरकर, गोविंद पवार, मधू पवार, बिभीषण सांगळे,प्रकाश पवार,पोलिस पाटील गिता पवार, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष बापू पवार, कैलास पवार, नाना गुळवे, संगिता पवार, शितल पवार,मधुकर इरकर,मारुती पवार,रामा सांगळे तसेच गावातील इतर ग्रामस्थ व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.