केळी उत्पादनावर अवलंबून न राहता प्रक्रिया उद्योगाकडे वळणे आवश्यक – योगीराज देवकर

करमाळा(दि.१२): “फक्त केळी उत्पादन व विक्रीवर अवलंबून राहण्याऐवजी त्याचे प्रक्रिया उद्योगाकडे वळणे काळाची गरज आहे.” असे प्रतिपादन विपणन तज्ज्ञ योगीराज देवकर यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना केले. मांजरगाव (ता. करमाळा) येथे सोलापूर जिल्ह्यातील निर्यातक्षम केळी उत्पादक व “ऊस उद्दिष्ट शंभर प्लस” शेतकरी ग्रुपच्या वतीने शिवार फेरीचे आयोजन करण्यात आले. यावेळी श्री. देवकर मार्गदर्शन करताना बोलत होते.
केळीपासून वेफर्स तयार करणे, तसेच धाग्यापासून वस्त्रनिर्मिती यासारख्या मूल्यवर्धनाच्या संधींबाबत श्री.देवकर यांनी माहिती दिली आणि तांत्रिक सहकार्याचे आश्वासन दिले.

बेंबळे (ता. माढा) येथील कृषिनिष्ठ शेतकरी सोमनाथ हुलगे यांच्या पुढाकारातून जिल्ह्यासह लगतच्या तालुक्यांतील दोनशेपेक्षा जास्त शेतकऱ्यांचा एक ग्रुप तयार करण्यात आला आहे. या ग्रुपच्या माध्यमातून शेतीतील नवे प्रयोग आणि यशस्वी तंत्रज्ञानाची माहिती इतर शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यात येते.
प्रत्येक महिन्याच्या ठराविक दिवशी एका प्रगतशील शेतकऱ्याच्या शेतावर शिवार फेरीचे आयोजन केले जाते. याच उपक्रमाअंतर्गत मांजरगाव येथील नानासाहेब इंगळे यांच्या केळीच्या शेतात नुकतीच शिवार फेरी पार पडली. या कार्यक्रमात जैन इरिगेशनचे किरण पाटील, प्रयोगशील शेतकरी अंगद पाटील व शंभूराजे जगताप यांनीही मार्गदर्शन केले.



