शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी प्रहारचे आमदारांच्या निवासस्थाना बाहेर मशाल आंदोलन - Saptahik Sandesh

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी प्रहारचे आमदारांच्या निवासस्थाना बाहेर मशाल आंदोलन

केम(संजय जाधव)- प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने जेऊर येथे मशाल आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी आणि पेरणीपासून कापणीपर्यंतचा खर्च MREGS योजनेतून करण्याची तसेच दिव्यांग बांधवांना दरमहा 6000 रुपये मानधन देण्याची मागणी करण्यात आली.

मा. बच्चूभाऊ कडू यांच्या आदेशानुसार 11 एप्रिल 2025 रोजी रात्री 9 वाजता जेऊर येथे आमदारांच्या निवासस्थानासमोर हे आंदोलन आयोजित करण्यात आले. निवडणुकीपूर्वी सर्वपक्षीय आमदारांनी शेतकऱ्यांना कर्जमाफीची आश्वासने दिली होती, मात्र सत्तेवर आल्यानंतर त्यावर कोणताही ठोस निर्णय घेतला गेलेला नाही.

महाराष्ट्रात दररोज 7 शेतकरी आत्महत्या करत असल्याचा नॅशनल क्राईम रेकॉर्डचा अहवाल सांगतो. अशा गंभीर परिस्थितीत शेतकऱ्यांचे प्रश्न विधानसभेत न मांडणाऱ्या आमदारांवर प्रहार संघटनेने टीका केली.

हे आंदोलन महात्मा फुले (11 एप्रिल) आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर (14 एप्रिल) यांच्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर झाले. निळा दुपट्टा, भगवा झेंडा आणि पेटती मशाल घेऊन कार्यकर्ते जेऊरला पोहोचले होते. मात्र, कायदा-सुव्यवस्थेचा भंग होऊ नये म्हणून पोलिसांनी त्यांना बायपासवर थांबवले.

प्रहार संघटनेच्या वतीने करमाळा पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदीप बनकर यांना आमदार नारायण आबा पाटील यांच्या नावे निवेदन देण्यात आले. निवेदनात पुढील मागण्या नमूद होत्या:

  • 1. शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी
  • 2. पेरणी ते कापणीपर्यंतचा खर्च MREGS मधून करणे
  • 3. दिव्यांग बांधवांना दरमहा 6000 रुपये मानधन

या मागण्या विधानसभेत मांडाव्यात व त्यांची पूर्तता करून शेतकरी आणि दिव्यांग बांधवांना न्याय मिळावा, ही प्रमुख अपेक्षा या आंदोलनामागे होती.

यावेळी प्रहार करमाळा तालुकाध्यक्ष संदीप तळेकर, जिल्हा सरचिटणीस बापू नेते तळेकर, उपाध्यक्ष पप्पू ढवळे, अशोक तळेकर, केम ग्रामपंचायत उपसरपंच सागर कुरडे आणि इतर अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

सुलेखन– प्रशांत खोलासे, केडगाव(ता.करमाळा)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!