तुमच्या गाडीवर वाहतूक नियम भंगाचे चुकीचे चलन पडले असेल तर तक्रार कशी करायची? सविस्तर वाचा

रस्त्यावर वाहन चालवताना आपल्याला वाहतुकीच्या विविध नियमांचे पालन करावे लागतात. जर एखादा नियम आपण मोडला आणि जर पोलिसांना तो आढळून आला तर ते आपल्याला अडवून आपल्याकडून दंड वसूल करतात. कधी कधी वाहन चालवणाऱ्याला अडवणे शक्य नसते अशा वेळी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत पोलीस मोबाईल द्वारे फोटो काढून संबंधित गाडीवर दंड लागू करतात.सिग्नल तोडणे, ओव्हर स्पीड ने गाडी चालविणे, सीट बेल्ट न लावणे, हेल्मेट न घालणे, तीन माणसे दुचाकी वर बसवणे गाडीला आरसे नसणे अशा विविध गोष्टींसाठी पोलीस मोबाईल द्वारा अथवा
सीसीटीव्ही द्वारा फोटो काढून संबंधित गाडी नंबरवर दंड लावतात.
हा दंड त्या गाडीच्या नंबरवर लागू होऊन तो पोलिस विभागाच्या सॉफ्टवेअर सिस्टीम मध्ये जतन केला जातो. तो आपल्याला कधी ना कधी गाडी अडविल्यानंतर भरावा लागतो.
असा दंड लागू केल्यानंतर पोलिस विभागाच्या सॉफ्टवेअर सिस्टीम मध्ये जर संबंधित गाडीच्या नंबर बरोबर गाडी मालकाचा मोबाईल नंबर जोडलेला असेल तर त्या मोबाईल नंबर वर दंड पडल्याचा मेसेज येतो. जर हा मेसेज आला नाही अथवा नजरचुकीने पाहिला गेला नाही तर आपल्या गाडीवर किती दंड पडलेला आहे तो कसा पहावा तसेच पडलेला दंड आपल्याला जर चुकीचा वाटत असेल तर त्यावर तक्रार कशी करावी हे आपण या लेखातून पाहूया.
तुम्ही वापरत असलेल्या गाडीवर कोणता दंड लागला आहे का हे चेक करण्यासाठी वाहतूक विभागाची वेबसाईट आहे व मोबाईल अँप्लिकेशन पण आहे. वेबसाईट ची लिंक खाली दिलेली आहे. https://mahatrafficechallan.gov.in/payechallan/PaymentService.htm?_qc=a8e46e23a51fb2f317ebfd8ac14f4eb3
गुगल वर maha traffic app असे सर्च करू शकता. तुम्ही खाली दिलेल्या स्क्रीन शॉट मध्ये पाहू शकता.हे वापरताना तुम्ही तुमच्या गाडीचा चॅसी नंबर/ इंजिन नंबर जवळ बाळगा.

ॲपचं नाव आहे महा ट्रॅफिक ॲप (MahaTrafficApp). ह्या ॲपवरून तुम्ही तुमच्या गाडीचा नंबर ऍड करून संबंधित गाडीवर किती चलन पडलेले आहे ते पाहू शकता. पडलेल्या चलनाविषयी सविस्तर माहिती जसे की कोणत्या सिग्नलला अथवा कोणत्या ठिकाणी कोणता नियम मोडला आहे? संबंधित फोटो आदी गोष्टी आपण तपासू शकतो.जर हे सर्व पाहून जर चलनावर तुमचा आक्षेप असेल तर याच ॲपवरून किंवा वेबसाईटवर तुम्ही त्यावर तक्रार सुद्धा नोंदवू शकता.

काही वेळेला आपल्या गाडीवर चुकीच्या पद्धतीने सुद्धा चलन/दंड पडू शकतो ते कसे याची लिस्ट खाली दिली आहे-
- जसे की एकाच दिवशी विविध सिग्नल वर दंड पडणे. उदाहरणार्थ – तुमच्या वाहनाला आरसा नसेल तर एका सिग्नल वर दंड पडणे पुरेसा आहे परंतु तोच दंड विविध सिग्नल वर पडला तर तुम्ही त्याची तक्रार देऊ शकता.
- एखादा दंड तुम्ही भरलेला आहे परंतु तरी देखील तो भरला नाही असे दाखवत असेल तर..
- तुमच्या गाडीचा नंबर कोणी डुप्लिकेट करून वापरत असेल आणि तो दंड तुमच्या नावावर पडला असेल तर..
- चुकून दुसऱ्या गाडीचा नियम भंगाचा दंड तुमच्या गाडीवर लागलेला असेल तर..
- चुकीचा पुरावा जोडलेला असेल तर..
- चार चाकी गाडीचे चलन दोन चाकी ला लावणे किंवा दुचाकीचे चलन चार चाकी गाडीला जोडणे..

अशा गोष्टींवर तक्रार करण्यासाठी या ॲप्लिकेशन मध्ये विविध पर्याय पोलीस विभागाकडून देण्यात आलेले आहेत. Grievance या मेन्यू/ऑपशन मध्ये जाऊन तुम्ही संबंधित चलनाविरुद्ध तक्रार दाखल करू शकता.
याच ॲपवरून तुम्हाला वाहतुकीचा नियम तुम्ही मोडला हे मान्य असेल तर या चलनाचे पैसे देखील भरू शकता.
कोणत्या नियम भंगाला किती दंड –
या ॲपवरून तुम्हाला वाहतुकीचे विविध नियम तोडल्यानंतर किती दंड असतो याची देखील माहिती समजू शकते.

रस्त्यातील धोकादायक स्थिती कळवू शकता
या ॲपवरील सिविलीयन रिपोर्ट या ऑपशन मधून तुम्ही रस्त्यावर एखादी घटना घडली असेल जसे एखादा अपघात झाला असेल, रस्त्यात काहीही धोकादायक स्थिती असेल की जसे रस्त्यात झाड पडले, ऑईल सांडले ई. अशी माहिती तुम्ही समाज हितार्थ ती पोलिसांपर्यंत पोहोचू शकता.
दुसरा व्यक्ती नियम सोडून वागत असेल तरी देखील तक्रार करू शकता – या ॲपवरून रस्त्यात कोणी व्यक्ती वाहतुकीचे नियम तोडून रस्त्यावर प्रवास करत असेल जसे की फॅन्सी नंबर प्लेट किंवा सीट बेल्ट विना गाडी चालवने, हेल्मेट विना गाडी चालवणे, ट्रिपल सीट गाडी चालवणे, गाडी चालवताना मोबाईलवर बोलणे या गोष्टींविषयी तुम्ही या ॲपवरून इतरांविषयी तक्रार देखील करू शकता परंतु सोबत तुम्हाला गाडीचा नंबर, फोटो काही पुरावे द्यावे लागतील.
अशाप्रकारे महा ट्रॅफिक ॲप चा आपण विविध गोष्टीसाठी वापर करू शकतो.
✍️ सुरज हिरडे, मो.8805238464