एक अनोखे गुराखी संमेलन - Saptahik Sandesh

एक अनोखे गुराखी संमेलन

खरोखरचं हे एक अनोखं साहित्य संमेलन म्हणावं लागेल. आपण हमेशा पाहतो साहित्य संमेलन, कवी संमेलन, त्या त्या क्षेत्रातील मातब्बर, माननीय, आदरणीय, विचारवंत, साहित्यिक, कवी, किंवा गझलकार इत्यादी मंडळींच्या सहवासामध्ये आणि असंख्य रसिक चाहत्यांच्या उपस्थितीत अनुभवलेला 2-4 दिवसाचा नयनरम्य सोहळा म्हणजे एक स्वर्ग सुखचं म्हणावं लागेल. असेच एक गुराखी साहित्य संमेलन यामध्ये मान्यवर जे असतात ते बहुतेक 12 बलुतेदार 18 अलुतेदार व महाराष्ट्राची जी लोककला आहे त्या विविध कलेचे उपासक यांची उपस्थिती अवर्णनीय असते. तर थोडासा दृष्टिक्षेप या संमेलनावर…

हे संमेलन नांदेड जिल्ह्याच्या, लोहा तालुक्यातील, कंधार, येथील गुराखी गडावर, दरवर्षी 26 ते 29 जानेवारी या कालावधीमध्ये भरवले जाते. पोतराज, तमाशा कलावंत, वाघ्या मुरळी, वारू, अस्वलवाले, माकडवाले, पांगुळ, चुडबुडकेवाले राईदर, मनकवडे, बहुरूपी, नंदीबैलवाले, वराह मालक, मसणजोगी,नाथगोसावी, फकीर , वासुदेव कोळी, वैदु , गोंदनवाल्या बाया, जाते उपटणाऱ्या माऊल्या, बाळ संतोष म्हणणाऱ्या माया, दशावतारी अशा अनेक भटक्या उपेक्षतांना व्यासपीठ मिळवून देण्यासाठी त्याची कला, त्यांची व्यथा, त्यांच्या समस्या, जाणून घेण्यासाठी या गुराखी संमेलनाची सुरुवात झाली.

या सर्व उपेक्षितांच्या रक्त आणि घामातून हे गुराखी साहित्य संमेलन जन्माला येतं. या संमेलनाच्या व्यासपीठावर अस्वल, मोर, कुत्रा, ससे, खेकडे, पानकोंबडी, मुंगूस, धोतरा, जाई, गुलाब, जुई, नागफना, गोबी, अक्कल खार, नाग ,नागिन, साप,मुंगूस, आग्या बोंड, हे सर्व असते कोबी, कांदे, वांगे, तसेच राना वनातील वेली, मधमाशांची पोळी, यांनी मंडप सजवला जातो. तोंडाला मुंगूस बांधलेला गुराखी या व्यासपीठावर बसलेला असतो. विविध वाद्य, शंखध्वनी, वाजंत्री आणि टाळ मृदंगाच्या नादात मसणजोगीच्या ढणढणत्या व शिंगाड्याच्या गगनभेदी रणगीतांनी या संमेलनाचे उद्घाटन होते. गारगोटीच्या चकमकीने वाळलेली लव्हाळी पेटवून दीप प्रज्वलन केले जाते. एका मडक्यामध्ये पुस्तक, पाटी ठेवलेली असते. ती ज्ञान हंडी फोडून संमेलन सुरू होते या संमेलनात मोर, लांडोर, मरणांगी, मसणजोगी, कुत्रा, कुत्री, कबूतर, कबुतरीण, पान कोंबडा, कोंबडी, यांचे आंतरजातीय विवाह लावले जातात.

यामध्ये दळण कांडण, उखाणे, गुलई, गीते, वगैरेंची स्पर्धा घेतली जाते. आदरणीय मा. केशवराव धोंगडे हे गुराखी साहित्य संमेलनाचे प्रणेते… राम प्रहरी तांबडफुटीच्या लाल भडक रंगाने शुक्राच्या चांदणीने अक्षरबद्ध केलेले अमर साहित्य म्हणजे हे गुराखी साहित्य, तसेच निसर्गाच्या कन्हण्याला, कुंथन्याला साथ देणारे साहित्य व कापूस वेचताना साळी कांडताना मुखातून बहरलेले अमर साहित्य तसेच श्रमपालांची गौरवगाथा म्हणजेच हे साहित्य संमेलन. मुक्या गुरा ढोरांची शेपटी धरून कैलासी उड्डाण मारणारी साहित्य सेवा म्हणजे गुराखी साहित्य आपल्या आदरणीय घोंगडे सरांनी 26 जानेवारी 1992 साली हे संमेलन सुरू केलेले आहे. म्हणजे अगदी आत्तापर्यंत म्हणजे 26 व 27 जानेवारी 2019 संमेलन गुराखी नटराज सवई गंधर्व मा. गणेशराव वनसागर यांनी उद्घाटन केले.

संमेलनाच्या पहिल्या दिवशी मिरवणुकीत गुराख्यांबरोबर उंट, साप, नंदी, गाढव, माकड, गाई, बैल इत्यादी प्राणी सहभागी होत असतात. कामाई मंदिरात अध्यक्ष व उद्घाटकाच्या हस्ते पूजा होते. त्यावेळी झाडावर शर्ट, टोपी , चड्ड्या, घातलेली माकडं उड्या मारत असतात. त्यावेळी गण सुरू होतो नंतर कामाई देवीची पूजा बांधली जाते दुसरीकडे वासुदेव, पोतराज, गोंधळी, फकीर , जथ्या जथ्याने थांबलेली असतात चुडबुडके वाले, सापवाले, उंटवाले, गारुडी, आपल्या हलग्या, ताशे, ढोलकी, अशी वाद्ये वाजवतात त्यावेळेस मोर, लांडोर त्या ठिकाणी नृत्य करतात. मंदिरातील पूजा संपल्यावर गुराखी दिंडीच्या रूपाने गुराखीगडाकडे जातात मल्ल खांबावर पैलवान कसरती करतात हा मल्लखांब बैलगाडीवर ठेवलेला असतो त्याच्यामागे पळसाच्या पानाच्या टोप्या घातलेले गुराखी असतात. नंतर गाढवावर मडक्याच्या लगडी घेऊन चालणारा कुंभार असतो ही मिरवणूक सुमारे दोन ते अडीच मैल लांबीची असते. भव्य दिव्य सोहळा असतो संमेलनाच्या व्यासपीठाला गुराखी पीठ असेच संबोधले जाते.

मधमाशाचे पोळे, वाळूक, चिमणीचे खोपे, शिकारी मुंगूस, वांगी, गाजरं , बोरं, बिब्याच्या माळा, पपया, आंब्याची पानं, खारीक, खोबरं, कांद्याची पात, अशा रानमेव्यानी गुराखी पीठ सजवलं जातं गुराखी पीठावर जागोजागी गुराखी ध्वज लावलेले असतात. ध्वजावर श्रीकृष्ण व गुराखीराजा अशी अक्षर असतात गुराखी पिठावर दहीहंडी लोंबकळत ठेवलेली असते उद्घाटक, प्रमुख पाहुणे, गुराखी, कलावंतांसह, शेळ्या, मेंढ्या, गाई, वासरं सगळे प्राणी काकढ्या, लचकन, गोफणी , चाबुक, साकारलेले असतात

कार्यक्रमास वंदे मातरम गीताने सुरुवात होते जागतिक शांततेसाठी आकाशात कबूतरं सोडली जातात नंतरचे सूत्रसंचालन मनकवडे म्हणजे करपालवी ही कला सादर करणारे कलाकार यांच्याकडे असते. एकेक जण व्यासपीठावर आपल्या दोन साथीदारासह व दुसरा प्रेक्षकांमधून हातांच्या बोटाद्वारे इशारे करतो. गुराखी पिठावरील सहकारी सांकेतिक भाषेतील शब्द ओळखून त्याचा ध्वनीतून उल्लेख करतो याच सूत्रसंचालनातून चकमक आणि गारगोटीतून विस्तव झाडून वाळलेल्या लव्हाळ्यांच्या काड्यांचा ढीग असा दीप प्रज्वलित केला जातो.
✍️किरण बेंद्रे, पुणे मो.7218439002

This meet (sammelan) is held at Gurakhi gad, Kandhar, Loha Taluka, Nanded District, from 26th to 29th January every year.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!