ऊसतोड मजुराची ३० हजार रू.किंमतीची मोटारसायकल चोरीला..
करमाळा / संदेश प्रतिनिधी
करमाळा : पाऊस आल्याने रस्त्याच्या कडेला दुकानाच्या शेडमध्ये मोटारसायकल लावून ऊसतोड मजूर झोपलेला असताना त्याची मोटारसायकल अज्ञात चोरट्याने पळवून नेली आहे. हा प्रकार १४ ऑक्टोबर २०२२ रोजी पहाटे दोनच्या दरम्यान कंदर (ता. करमाळा) येथे घडला आहे.
या प्रकरणी लहू गुलाब भील (ऊसतोड कामगार रा.भट्टगाव, ता. बडगाव, जि. जळगाव) यांनी करमाळा पोलीसात फिर्याद दिली. त्यात त्यांनी म्हटले, की आम्ही सचिन पवार (रा. श्रीपूर, ता. माळशिरस) यांच्या टोळीत ऊसतोडणीचे काम करत असून, ते काम करण्यासाठी श्रीपूर येथे आमच्या गावावरून माझी मोटारसायकल क्र. एमएच १९ आर.बी.०९३२ या गाडीवर निघालो होतो.
रस्त्यात कंदर (ता. करमाळा) येथे पाऊस आल्याने तेथील गुरूसेवा ट्रेडर्स ॲन्ड पेंटस् या दुकानासमोरील शेडमध्ये गाडी लावून रात्री निवायाला झोपलो असताना पहाटे दोनच्या दरम्यान मला जाग आली व सहज गाडीकडे गेलो असता, ज्या ठिकाणी गाडी लावली तेथे गाडी दिसून आली नाही. तेथे सर्वत्र पाहिले परंतू गाडी कोठेच दिसून आली नाही. यावरून अज्ञात चोरट्यांनी गाडी पळवून नेल्याची खात्री झाली. त्यामुळे अज्ञात चोरट्याविरूध्द माझी तक्रार आहे. या प्रकरणी करमाळा पोलीसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.