सामान्य व्यक्तीने बजाज फायनान्स व बँकेविरूध्द जिंकला लढा
करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा : पोंधवडी (ता. करमाळा) येथील दादा परबत राऊत यांनी बजाज फायनान्स व स्टेट बँक, औरंगाबाद यांच्या विरूध्द ग्राहक पंचायत मध्ये तक्रार देऊन तो लढा नुकताच जिंकला आहे.
यात हकीकत अशी, की दादा परबत राऊत यांनी बजाज फायनान्स, औरंगाबाद यांच्याकडून मोबाईल घेण्यासाठी १३ जुलै २०१९ रोजी १६ हजार ९९९ रू. कर्ज घेतले होते. राऊत यांनी हे कर्ज स्टेट बँक, शाखा वाळुंज (औरंगाबाद) या शाखेत ठरलेल्या वेळच्या वेळी भरले व ३० सप्टेंबर २०१९ ला कर्ज फेड केल्यानंतर थकबाकी नसल्याचे प्रमाणपत्र घेतले. त्यानंतरही फायनान्स कंपनीने राऊत यांच्या खात्यातून १७ डिसेंबर २०१९ व १९ डिसेंबर २०१९ रोजी प्रत्येकी २९५ रू. वसुल केले. ही अतिरिक्त रक्कम वसुल केल्याप्रकरणी राऊत यांनी जिल्हा तक्रार ग्राहक निवारण आयोग, औरंगाबाद यांचेकडे हा खटला दाखल केला.
त्याचा नुकताच २८ जुलै २०२२ ला जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाच्या सदस्या संध्या बारलिंगे व किरण ढोले यांनी निर्णय दिला आहे. त्यामध्ये फायनान्स कंपनीने राऊत यांना चुकीच्या पध्दतीने वसुल केलेले ५९० रूपये व त्यावर ४ ऑक्टोबर २०१९ पासून ३.२५ टक्के दराने नुकसान भरपाई व १० हजार रूपये मानसिक त्रासाबद्दल ३० दिवसाच्या आत देण्याचा आदेश केला आहे. अनेकवेळा वित्तीय संस्था व बँक सर्वसामान्य माणसाला त्रास देतात. राऊत यांची रक्कम थोडी असलीतरी त्यांनी झालेला अन्याय दूर करण्यासाठी हा लढा लावला व जिंकला. त्याबद्दल करमाळा येथील ग्रामसुधार समितीच्या वतीने दादा परबत राऊत यांचे अभिनंदन केले आहे.