कविटगाव येथील ३० लाखांचा दरोडा व अपहरण प्रकरणातील तिघांची निर्दोष मुक्तता…
करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा : करमाळा तालुक्यातील कविटगाव येथे कार आडवी लावून, ट्रक अडवुन ड्रायव्हर व क्लीनर यांच्यासह ३० लाख रुपयांचा दरोडा व अपहरण करून मारहाण केल्याप्रकरणातील तिघांची बार्शी येथील अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस.डी.अगरवाल यांनी निर्दोष मुक्तता केली आहे. यात आरोपीतर्फे ॲड. निखिल पाटील व ॲड. दत्तप्रसाद मंजरतकर यांनी काम पाहिले.
यात हकीगत अशी की १६ जानेवारी २०१७ रोजी यातील फिर्यादी दिपक लालसिंग चौहान व त्याचा साथीदार जितेंद्र डावर हे त्यांच्याकडील मालट्रक नंबर M.P. 09-HH 7871 यामधून 26 टन चना भरून इंदोर (मध्यप्रदेश) कडे निघाले होते व १८ जानेवारी २०१७ रोजी ते रात्री साडेनऊ वाजण्याची सुमारास टेंभुर्णीतून निघाले असता कविटगाव तालुका करमाळा येथे आल्यानंतर रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास चार लोकांनी त्यांची कार आडवी लावून सदरचा ट्रक अडवला व ट्रक मधील ड्रायव्हर व क्लीनर यांचे अपहरण करून सदरचा ट्रक व त्यातील चण्यासह पळून घेऊन गेले व ड्रायव्हर व क्लिनर यांना शेंद्री (ता.बार्शी) गावाच्या हद्दीत सोडून दिले, त्यानंतर यातील फिर्यादी यांनी करमाळा पोलीस स्टेशन येथे फिर्याद दाखल केली होती.
सदर घटनेचा तपास करून पोलीस उपनिरीक्षक एस आर दबडे यांनी आरोपी विरुद्ध आरोप पत्र दाखल केले. सदर प्रकरणाची सुनावणी बार्शी येथील अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस डी अगरवाल यांच्यासमोर झाली या प्रकरणी 1)सचिन संजय बनसोडे राहणार कासेगाव तालुका पंढरपूर 2) प्रशांत श्रीमंत नलावडे राहणार नारायण चिंचोली तालुका पंढरपूर 3) बंडू दामू मासाळ राहणार धायटी तळ तालुका सांगोला यांच्याविरुद्ध खटला चालला.
सदर प्रकरणात आरोपींच्यावतीने ॲड. निखिल पाटील यांनी यातील आरोपींची ओळख परेड झालेली नसून कोणताही साक्षीदार दरोडा घालणारे अथवा अपहरण करणारे आरोपी हेच होते हे सांगण्यास असमर्थ ठरले आहेत तसेच कोणताही परिस्थितीजन्य पुरावा आरोपींच्या विरोधात नसून आरोपींना केवळ संशयावरून अटक करण्यात आलेली होती असा युक्तिवाद केला सदरचा युक्तिवाद ग्राह्य धरून आरोपी सचिन संजय बनसोडे ,प्रशांत श्रीमंत नलावडे व बंडू दामू मासाळ यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली. सदर केस मधील इतर आरोपी अद्यापही फरार असून त्यांच्याविरुद्ध तपास अद्याप चालू आहे. यात आरोपीतर्फे ॲड.निखिल पाटील ॲड. दत्तप्रसाद मंजरतकर यांनी काम पाहिले.