अतिवृष्टीबाधित भागातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क माफ करावे – सामाजिक कार्यकर्ते गणेश पवार
केम (प्रतिनिधी – संजय जाधव) : शैक्षणिक वर्ष सन 2022-2023 या कालावधीतील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क माफ करण्याची मागणी वडशिवणे( ता.करमाळा) येथील सामाजिक कार्यकर्ते गणेश पवार यांनी शिक्षण मंत्री व शिक्षण उपसंचालक यांच्या कडे एका लेखी निवेदनाद्वारे केली आहे.
दिलेल्या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, सध्या संपूर्ण महाराष्ट्रात परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला असून शेतकऱ्याच्या शेतातील उभ्या पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. तसेच शेतीचेही नुकसान झाले आहे. यामुळे शेतकऱ्यांपुढे प्रचंड आर्थिक संकट उभा असून सध्या शेतकऱ्यांचे जगणे ही मुश्किल झाले आहे , तरी कृपया चालू शैक्षणिक वर्षातील माध्यमिक , उच्च माध्यमिक व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची संपूर्ण शैक्षणिक फी माफ करण्यात यावी व सदर निर्णयाचे आदेश आपले कार्यालयामार्फत संबंधित विभागास देण्यात यावेत.
हे निवेदन महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर व शिक्षण संचालक माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ , पुणे यांना दिले आहे.