उजनी लाभक्षेत्रातील शेतकरी संतप्त; आठ तास वीजपुरवठ्यासाठी निवेदन

करमाळा : करमाळा तालुक्यातील उजनी लाभक्षेत्रातील धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या शेतीपंपांना अनियमित वीजपुरवठा होत असल्याने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. दिवसभरात आठ तास वीजपुरवठा अपेक्षित असताना केवळ दोन ते चार तास वीज मिळत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. याबाबत करमाळा तहसीलदारांकडे निवेदन देण्यात आले असून, वीजपुरवठा सुरळीत न झाल्यास १८ सप्टेंबरला रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.



निवेदनात म्हटले आहे की, लोडशेडिंगमुळे उजनी लाभक्षेत्रातील गावांचा वीजपुरवठा वारंवार खंडित केला जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना पिकांना आवश्यक पाणी देता येत नाही. परिणामी उभी पिके वाळण्याच्या मार्गावर असून शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे.

सध्या पावसाचे प्रमाण अत्यंत कमी असल्याने उजनी जलाशयातून पाणी देण्याशिवाय शेतकऱ्यांसमोर पर्याय नाही. उजनी जलाशयात मोठ्या प्रमाणात पाणीसाठा उपलब्ध असतानाही वीजपुरवठा सुरळीत नसल्यामुळे या पाण्याचा पिकांसाठी उपयोग करता येत नसल्याची नाराजी शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.



धरणग्रस्त शेतकऱ्यांवरच लोडशेडिंग लादणे हा अन्याय असून, शासन व महावितरणने याची तातडीने दखल घ्यावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. उजनी लाभक्षेत्रातील सर्व गावांना दिवसभरातील हक्काचा आठ तासांचा वीजपुरवठा सुरळीत सुरू ठेवावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

दरम्यान, १७ सप्टेंबर २०२६पर्यंत वीजपुरवठा आठ तास सुरळीत करण्यात आला नाही, तर १८ सप्टेंबर २०२६ रोजी जेऊर येथील महावितरण कार्यालयासमोर अहिल्यानगर – टेंभुर्णी या महामार्गावर ठिय्या आंदोलन करण्यात येईल, असा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.

निवेदनाच्या प्रती जिल्हाधिकारी सोलापूर, करमाळा पोलीस ठाणे, महावितरण कार्यालय करमाळा, महावितरण कार्यालय जेऊर तसेच संबंधित कार्यालयांना देण्यात आल्या आहेत.

error: Content is protected !!