करमाळा लोकन्यायालयात 116 खटले तडजोडीने निकाली
करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा : करमाळा येथील दिवाणी न्यायालयामध्ये आयोजित केलेल्या लोकआदालत मध्ये एकूण 116 खटले तडजोडीने निकाली काढण्यात आले तर बँकांचे रक्कम रुपये 2 कोटी 49 लाख 87 हजार 985 रुपयांची वसुली करण्यात आली.
या लोकन्यायालयाचे आयोजन करमाळा येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयामध्ये करण्यात आले होते. या लोकन्यायालयाचा शुभारंभ या न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश सौ.मीना एखे यांचे हस्ते करण्यात आले. याप्रसंगी यावेळी सहदिवाणी न्यायाधीश आर.ए.शिवरात्री तसेच वकील संघाचे अध्यक्ष ॲड.विकास जरांडे उपाध्यक्ष ॲड.प्रमोद जाधव तसेच सचिव ॲड.योगेश शिंपी व वकील संघाचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी सूत्रसंचालन रामेश्वर खराडे यांनी केले.
या लोकन्यायालयात दिवाणी व फौजदारी प्रलंबित प्रकरणांपैकी 48 प्रकरणे तडजोडीने मिटवण्यात आली. यामध्ये एकूण 30 लाख 6 हजार 701 रुपयांची वसुली करण्यात आली तर दाखल पूर्व प्रकरणांपैकी एकूण 68 प्रकरणे निकाली निघून दोन कोटी 49 लाख 87 हजार 985 रुपयांची वसुली करण्यात आली. याप्रसंगी न्यायालयीन क्लार्क, कर्मचारी नागरिक उपस्थित होते.