करमाळा तालुक्यातील ८ ग्रामपंचायत निवडणूक रणधुमाळी – वांगी १,२,३,४ व भिवरवाडी या ग्रामपंचायतीची पहिल्यांदाच निवडणुक
करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा : करमाळा तालुक्यात पूर्वी एकत्र असलेल्या ग्रांमपंचायतींमधून विभागणी होऊन नव्याने स्थापन झालेल्या चार ग्रामपंचायतींमध्ये पहिल्यांदाच निवडणूक रणधुमाळी सुरु झाली असून या नव्याने स्थापन झालेल्या स्वतंत्र ग्रामपंचायतींमुळे १७ जागेवरून येथे याठिकाणी ३६ जागा झाल्या आहेत. त्यामुळे इच्छुकांना संधी मिळाली असून या निवडणूकीसाठी उमेदवारांची जोरदार तयारी सुरु झाली आहे.
करमाळा तालुक्यात वांगी १, वांगी २, वांगी ३, वांगी ४ व भिवरवाडी या ग्रामपंचायतीमध्ये पहिल्यांदाच निवडणुक होत आहे, पूर्वी येथे ग्रुप ग्रामपंचायत असल्याने एका गावाला साधारण २ ते ३ जागा वाट्याला येत होत्या. त्यामुळे इच्छुकांना संधी मिळत नव्हती. तेथे सर्व १७ जागा होत्या, आता या चार ग्रामपंचायतीच्या ३६ जागा आहेत.
करमाळा तालुक्यात नव्याने स्थापन झालेल्या ग्रामपंचायतीसह वडशिवणे, आवाटी, सातोली व बिटरगाव या ग्रामपंचायतच्या ७२ जागांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजे मंगळवारी (ता. १९) दुपारी ३ वाजेपर्यंत ३१६ अर्ज आले आहेत. या अर्जांची बुधवारी (ता.२०) सकाळी ११ ते ३ या दरम्यान छानणी होणार आहे. तालुक्यातील आठ ग्रामपंचायतीमध्ये वांगी १ या ग्रामपंचायतीसाठी सर्वाधिक म्हणजे ६० अर्ज दाखल झाले आहेत. तर सातोली ग्रामपंचायतीसाठी सर्वाधिक कमी म्हणजे २२ अर्ज दाखल झाले आहेत.
वांगी १ येथे ११ जागांसाठी ६० अर्ज, वांगी २ येथे ९ जागांसाठी ४६ अर्ज, वांगी ३ येथे ९ जागांसाठी ३० अर्ज, वांगी ४ व भिवरवाडी येथे 7 जागांसाठी ३६ अर्ज, वडशिवणे येथे ९ जागांसाठी ३३ अर्ज, आवाटी येथे ९ जागांसाठी ५२ अर्ज, सातोली येथे ७ जागांसाठी २२ अर्ज, तर बिटरगाव येथे ९ जागांसाठी ३७ अर्ज आले आहेत.