पोलीस ‘पती’स आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या ‘पत्नी’स न्यायालयीन कोठडी – दुसरा संशयित आरोपी अद्याप फरार..
करमाळा / संदेश प्रतिनिधी
करमाळा, ता. १२ : पोलीस पतीस आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या संशयित आरोपी पत्नीस आज न्यायालयात हजर केले असता तिला न्यायालयीन कोठडी दिली आहे. पोलीसांनी आणखी पोलीस कोठडीची मागणी केली होती. ती मागणी न्यायाधीश भार्गवी भोसले यांनी फेटाळली असून, या गुन्ह्यातील दुसरा संशयित आरोपी असलेला पोलीस अद्याप फरार आहे.
यात हकीकत अशी, की करमाळा येथील पोलीस कार्यालयात पोलीस शिपाई म्हणून कार्यरत असणारे आकाश अभिमान तोगे (वय-२६) यांनी ७ फेब्रुवारी २०२४ च्या रात्री ११ – २० वाजता बागवाननगर येथील प्रदीप चोपडे यांच्या घरात फॅनला साडीने गळफास लावून आत्महत्या केली होती. त्यात मयताचा भाऊ सुरज अभिमान तोगे (वय-२७) रा. घोळवेवाडी, ता. बार्शी, जि. सोलापूर यांनी फिर्याद दिली आहे. त्यात त्यांनी म्हटले, की माझा भाऊ आकाश (वय २६) हा करमाळा येथे पोलीस शिपाई या पदावर कार्यरत होता.
गेल्या दोन वर्षापुर्वी त्याचा पोलीस कॉन्स्टेबल असलेल्या २८ वर्षाच्या तरुणीशी प्रेमविवाह झाला होता. तिचे पुर्वी लग्न झाले होते. गेल्या दोन महिन्यापुर्वी माझा भाऊ व त्याची पत्नी हे आमच्या गावी आले होते. त्यावेळी भावाने माझी पत्नी हवालदार गणेश शिंदे याच्याबरोबर फोनवर जास्त बोलते. त्यावेळी तिला तशी सुचना दिल्यानंतर तिने मी शिंदे बरोबर बोलणार नाही, असे सांगितले.
७ फेब्रुवारी २०२४ च्या रात्री मित्राचा फोन आला व त्यांनी सांगितले, की आकाशने ‘भानुनगर बॉईज’ या ग्रुपवर रात्री ११ वाजून ०५ मिनीटांनी चिठ्ठीचा फोटा टाकला आहे. त्यात त्याने म्हटले की, हवालदार गणेश शिंदे व महिला कॉन्स्टेबल माझी बायको यांचे रिलेशन चालू होते व आहे. त्यांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करत आहे… वगैरे मजकूर लिहिला आहे. मी ती चिठ्ठी पाहताच माझा भाऊ आकाश यास चार-पाच फोन केले, पण त्याने उचलले नाही. त्यानंतर मी त्याच्या पत्नीला फोन केले, तीनेही चार फोन उचलले नाही. पाचवा फोन उचलला व सांगितले, की आकाशने घरातील फॅनला गळफास घेतला आहे.
या प्रकरणी पोलीसांनी संशयित आरोपी महिला पोलीस कॉन्स्टेबल व पोलीस हवालदार गणेश शिंदे या दोघांच्या विरूध्द आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला. त्यानंतर आरोपी महिला कॉन्स्टेबल हिला ८ फेब्रुवारीला अटक केली. तिला ९ फेब्रुवारीला न्यायालयात हजर केले असता, तिला १२ फेब्रुवारी – पर्यंत पोलिस कोठडी दिली होती. आज पुन्हा न्यायाधीश श्रीमती भार्गवी भोसले यांच्या न्यायालायत तिला हजर केले असता, तिला पोलीस कोठडी न देता न्यायालयीन कोठडी दिली आहे. यातील दुसरा आरोपी हवालदार गणेश शिंदे हा अद्याप फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक श्री. चंदनशिव हे करत आहेत.