आईच्या पुण्य स्मरणानिमित्ताने नेरले शाळेतकेले शैक्षणिक साहित्य वाटप
करमाळा ( संदेश प्रतिनिधी) : नेरले येथे सर्जेराव पन्हाळकर व त्यांच्या परिवाराने आईच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त स्वातंत्र्यदिनी जिल्हा परिषद शेळके वस्ती शाळा नेरले येथील पहिली ते चौथी व बालवाडी ,अंगणवाडी अशा एकूण पन्नास विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप केले.
या कार्यक्रमाचे नियोजन शाळा व्यवस्थापन समिती व मुख्याध्यापक श्री अंबुरे यांनी केले. यामध्ये प्रत्येक विद्यार्थ्यास दोन वह्या, कंपास पेटी, पेन ,पेन्सिल व बालवाडीतील मुलांना अंकलीपी, पाटी ,पेन्सिल बॉक्स अशा प्रकारचे शैक्षणिक साहित्य सर्जेराव पन्हाळकर ,अंकुश लोभे अरुण महाडिक व इतर गाव ग्रामस्थ यांच्यातर्फे विद्यार्थ्यांना देण्यात आले.
या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून देवगड महाविद्यालयातील प्राध्यापक धनंजय पन्हाळकर हे उपस्थित होते. शिक्षक वर्ग व गावातील ग्रामस्थांनी या वेगळ्या परंपरेला चांगला प्रतिसाद दिला असून अशाच प्रकारचे विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळे उपक्रम ग्रामस्थांनी राबवावेत असे मत मुख्याध्यापक श्री अंबुरे यांनी यावेळी व्यक्त केले. याचबरोबर विद्यार्थ्यांना पिण्याच्या पाण्यासाठी आर ओ फिल्टर बसवायची इच्छा मुख्याध्यापकांनी यावेळी व्यक्त केली. त्यानंतर प्रमुख पाहुणे धनंजय पन्हाळकर यांच्यासह ग्रामस्थांनी जवळपास १६ हजार रुपये वर्गणी गोळा करून फिल्टर बसविण्याचे नियोजन देखील केले.
यावेळी श्री. पन्हाळकर यांनी आपल्या भाषणामध्ये शाळेतील परंपरा व यशोगाथा मांडत असताना सांगितले की, या शाळेतून शिक्षण घेऊन बाहेर पडलेले अनेक विद्यार्थी मोठमोठ्या पदावर काम करत आहेत. या शाळेमध्ये चौथीपर्यंत शिकणारा विद्यार्थी गौंडरे येथील हायस्कूलमध्ये इयत्ता दहावी मध्ये नेहमी प्रथम किंवा द्वितीय क्रमांकाने उत्तीर्ण होतात तरी पालकांनी खाजगी सेमी इंग्लिश, इंग्लिश मीडियम अशा शाळेच्या पाठीमागे न लागतात जिल्हा परिषदूच्या शाळेवर विश्वास ठेवावा आणि आपल्या या मातीतील शिक्षण घेऊन त्यांचं भविष्य उज्ज्वल करावे असे मत पन्हाळकर सर यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अंबुरे सर यांनी केले. सरवदे सरांनी मुलांच्या विविध कवायती करून घेतल्या . लहान मुलांनी विविध स्पर्धेमध्ये भाग घेतला होता. त्याचे बक्षीस वितरण गावातील प्रतिष्ठित लोकांच्या हस्ते करण्यात आले. अशाप्रकारे भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव हा कार्यक्रम नेरले येथील जिल्हा परिषदेच्या शेळके वस्ती शाळेमध्ये संपन्न झाला. सरवदे सर यांनी सर्व मान्यवरांचे आभार मानले . शेवटी मुलांना खाऊ वाटप करुन कार्यक्रमाची सांगता झाली.