“घरतवाडी विकणे आहे ?” “शासकीय यंत्रणेवर बहिष्कार” अशा विविध प्रकारचे पोस्टर्स सोशल मिडियावर व्हायरल – घरतवाडी येथील युवकांची गांधीगिरी..
करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा : “घरतवाडी विकणे आहे ?” “शासकीय यंत्रणेवर बहिष्कार” अशा विविध प्रकारचे पोस्टर्स तयार करून घरतवाडी (ता.करमाळा) येथील युवकांनी एकत्र येऊन शासकीय यंत्रणेवर बहिष्कार टाकण्याचा ठरवले असून, विविध गैरसोयीबाबतीत पोस्टर तयार करून या युवकांनी सोशल मीडियावर सध्या व्हायरल केले आहेत.
या पोस्टरमध्ये “घरतवाडी विकणे आहे”, “शासकीय यंत्रणेवर बहिष्कार”, भारत स्वतंत्र होवून ७५ वर्षे पूर्ण झाली तरी, घरतवाडी गावाला डांबरी रोड नाही..!” “कधी मिळणार आमच्या हक्काचा डांबरी रस्ता”, “निष्क्रिय शासन यंत्रणा आणि ढिम्म प्रतिनिधी” “आमच्या हक्काचा रस्ता मिळालाच पाहिजे..!” पांढरपेशा लोकप्रतिनिधींकडून होतोय जाणीवपूर्वक आमच्यावर अन्याय” अशा प्रकारची विविध डिजिटल पोस्टर तयार करून सोशल मीडियावर या युवकांनी प्रसिद्ध केले आहेत. त्यामुळे हे गाव चांगलेच चर्चेत आले आहे.
घरतवाडी (ता.करमाळा) हे गाव करमाळा तालुक्यातील शेवटच्या टोकाला असल्याने या गावावर वारंवार अन्याय झालेला आहे, असे या युवकांचे म्हणणे आहे, या गावाला भारत स्वतंत्र होऊन 75 वर्ष होऊन गेले तरी सुद्धा डांबरी रस्ता नाहीये त्यामुळे येथील नागरिकांची वाटचाल अत्यंत खडतर प्रवासातून होत आहे, या भागातील वृद्ध नागरिक, शाळकरी विद्यार्थी, दुचाकी, चारचाकी वाहनचालक यांना या वाहतुकीचा प्रचंड मोठा सामना करावा लागत आहे.
त्यामुळे या गावातील तरुणांनी एकत्र येऊन शासकीय यंत्रणेवर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला आहे, किमान हे पोस्टर प्रदर्शित करून तरी शासनाला जाग आली तर या गावाला डांबरी रस्ता मिळेल व इतर सुविधा उपलब्ध होतील, विविध डिजिटल पोस्टर तयार करून सोशल मीडियावर या युवकांनी प्रसिद्ध केल्याने घरतवाडी हे गाव चांगलेच चर्चेत आले आहे.
“आम्हा गावकऱ्यांचा कोणाला विरोध अथवा दोष देणार नाही, रस्त्याचा विकास होण्यासाठी सर्व गावकरी एका छताखाली आलो आहोत, आम्ही एकजूट केली असून जोपर्यंत डांबरी रस्ता होत नाही, तोवर शासकीय यंत्रणेवर बहिष्कार घालण्याचा निर्णय गावकऱ्यांच्या बैठकीत घेण्यात आला आहे, लोकप्रतिनिधींच्या दूरदृष्टीचा अभाव आणि निष्क्रिय शासन यंत्रणा यामुळे विकास खुंटला आहे. भविष्यात होणाऱ्या कोणत्याही निवडणुकीत सहभागी न होण्याचा निश्चय घेण्यात आला आहे.”
– अनिकेत गायकवाड (घरतवाडी,ता.करमाळा)