क्षमतेपेक्षा जास्त पाणी झाल्याने झाडांना इन्फेक्शन – डाळिंबे गळून पडली
करमाळा (प्रतिनिधी – सुरज हिरडे) : मागच्या २ आठवड्यात झालेल्या परतीच्या पावसाने करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान केले आहे. दिवसरात्र मोठ्या मेहनतीने जपलेल्या बागा, ऊस, खरीप हंगामातील पिके बाजारात नेण्याआधीच भुईसपाट झाली आहेत. त्यामुळे ऐन दिवाळीच्या सणासुदीच्या काळात शेतकऱ्यांवर अस्मानी संकट कोसळले आहे.
अशाच प्रकारे हिवरवाडी (ता.करमाळा) येथील गोविंद पवार यांच्या ७०० झाडांच्या डाळिंबाच्या बागेचे प्रचंड नुकसान झाले आहे. परतीच्या पावसाने डाळिंबाला क्षमतेपेक्षा जास्त पाणी झाल्याने झाडांना इन्फेक्शन झाले व त्यामुळे त्याला आलेली सर्वच डाळिंबे गळून पडली आहेत. शिवाय जवळपास सर्वच झाडे जळून जाण्याच्या मार्गावर आहेत.
पवार यांनी आपल्या २ एकर क्षेत्रामध्ये ही ७०० डाळींबाची झाडे लावलेली होती. दिवाळीनंतर ही डाळिंबे बाजारात जाण्याच्याच मार्गावर होती. सध्या बाजार चांगला असल्याने ७ ते ८ लाखापर्यंत उत्पन्न अपेक्षित होते. परंतु परतीच्या मान्सूनने झालेल्या अतिवृष्टीमूळे हातात आलेला घास पवार कुटुंबाकडून हिरावून नेला आहे. हिवरवाडी परिसरातील अनेक शेतकऱ्यांचे या पावसाने छोट्या मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
शासनाने या नैसर्गिक आपत्तीने झालेल्या नुकसानीचा लवकरच पंचनामा करून भरपाई मिळवून द्यावी अशी अपेक्षा यावेळी हिवरवाडीच्या शेतकऱ्यांनी केली आहे.
मी आणि माझी पत्नी आम्ही दोघांनी मिळून दिवसरात्र मेहनत घेऊन डाळिंबाची बाग फुलविली होती. या डाळिंबाच्या बागेवर आम्ही जवळपास १ लाख ३० हजार रुपये खर्च केला होता. सध्या बाजार पण चांगला होता पण नैसर्गिक संकटाने होत्याचे नव्हते केले. आता आम्हाला परत नव्याने बाग लावावी लागणार आहे. शासनाने आम्हाला नैसर्गिक संकटामुळे झालेल्या नुकसानीचा योग्य तो पंचनामा करून नुकसान भरपाई मिळवून द्यावी. –गोविंद पवार, हिवरवाडी