दिवाळी सुरू झाली तरी शंभर रुपयात मिळणार असलेला शिधा संच अजून रेशन दुकानात आला नाही

केम ( प्रतिनिधी-संजय जाधव) : गरिबांची दिवाळी गोड करणारा शिंदे सरकारने घोषित केलेला उपक्रम दिवाळी सुरू झाली तरी अजून दारिद्र्य रेषेखालील कार्डधारकांना शिधासंच अजून आले नाही. गोरगरीब जनता या शिधा संचकडे डोळे लावून बसली आहे.
शासनाने सामान्य जनतेची दिवाळी गोड व्हावी म्हणून राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेतील शिधापत्रिका धारकांना रेशन दुकानातून अवघ्या शंभर रुपयात एक किलो रवा, एक किलो तेल, एक किलो दाळ व एक किलो साखर अशा चार वस्तू दिवाळीच्या सणाला रेशन दुकानातून देण्याची घोषणा केली होती. यामुळे गरिब जनता आनंदात होती. या वर्षी आपल्याला चांगली दिवाळी साजरी करता येईल अशी आशा या कार्डधारकांना होती. परंतु प्रत्यक्षात दिवाळी सुरू झाली असून अजून या मालाचे किट रेशनवर आले नाही. गरिब जनता या दुकानात हेलफाटे घालून थकली आहे त्यामुळे या कार्डधारकांतून शासनाच्या या उपक्रमाविषयी नाराजी निर्माण झाली आहे.
दिवाळी सुरू झाली आहे पण अजून रेशन दुकानात हा १०० रुपयांमध्ये मिळणार असणारा रेशन किट अजूनआला नाही. आम्ही दुकानात हेलफाटे घालून कंटाळून गेलो. मग हा माल मिळणार का नाही? का ही फक्त घोषणा होती असे वाटत आहे. – ऊत्तरेश्वर गोडगे, केम (दारिद्र्य रेषेखालील कार्डधारक)