कारखान्याच्या काजळीमुळे जीवनमान झाले मुश्कील – तांबवे ग्रामपंचायतीने शिंदे कारखान्यास दिले निवेदन
करमाळा (संदेश प्रतिनिधी) : माढा (जिल्हा सोलापूर) तालुक्यातील विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याच्या धुराडीतून निघत असलेली काजळीमुळे तांबवे (टे) ता. माढा व परिसरातील नागरिकांचे जीवनमान अडचणीत आले आहे. या काजळी वर कारखाना प्रशासनाने काहीतरी उपाययोजना करावी अशा विनंतीचे निवेदन तांबवे (टे) ग्रामपंचायतीच्यावतीने विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याच्या कार्यकारी संचालक यांना देण्यात आले आहे.
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मौजे तांबवे (टे) ता. माढा गावालगत सन २००१ पासून विठ्ठलराव शिंदे सह. साखर कारखाना असून गावातील खटके वस्ती, लटठे वस्ती, गंगामाईनगर, गावठाण व इतर वस्त्यावर राहणाऱ्या लोकांना कारखान्याच्या काजळीमुळे व मळीच्या प्रदूषित पाण्यामुळे खूप त्रास होत आहे. मौजे तांबवे (टे) गावच्या हद्दीमध्ये केळी, द्राक्षे, पपई, डाळींब अश्या विविध प्रकारच्या फळबागांचे काजळी मुळे खूप मोठे नुकसान होत आहे. तरी या बाबत तेथे राहणाऱ्या लोकांना व फळबागांना काजळी व दूषित पाण्याचा त्रास होणार नाही याची काळजी घ्यावी.
विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याच्या दहा किलोमीटरच्या परिघामध्ये काजळीमुळे विहीर, बोअर व सर्व पाण्याचे स्त्रोत दूषित झाले आहेत.त्यामुळे डास उत्पत्तीचे प्रमाण वाढले आहे. तांबवे व पंचक्रोशी मध्ये डेंगूचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर आढळून येत आहेत.तसेच दूषित हवा पाणी व जमिनीमुळे कॅन्सर सारखे दूर्धर आजार निर्माण होऊ शकतात. तसेच श्वसनाचे आजार, पोटाचे विकार, वंध्यत्व, दृष्टी जाणे, विस्मरण यासारखे गंभीर आजार उद्भवू शकतात.कारखाना प्रशासनाने यावर काहीतरी उपाययोजना करावी अशा विनंतीचे निवेदन दिले आहे.याबाबतीत सुधारणा होत नसल्यास पुढील मार्ग अवलंबण्यात येईल. – सचिन कांबळे, सरपंच तांबवे, ता.माढा