गुलालाची उधळण व डॉल्बीला फाटा देत टाळ मृदंगाच्या ठेक्यावर पारंपारिक पद्धतीने गणरायाला निरोप…
करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा : पोथरे (ता.करमाळा) येथील ढेकळेवाडी वस्तीवरील जय हनुमान मित्र मंडळाने प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षीही गणेश स्थापना केली, मात्र यावर्षी मित्रमंडळाने गुलाल व डी जे वर नाचण्यापेक्षा ऋषीमुनी व संत परंपरेने घालून दिलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमावर गणरायाला निरोप देण्याचे ठरवले व त्यानुसार गुलालाची उधळण व डॉल्बीला फाटा देत टाळ मृदंगाच्या ठेक्यावर ताल धरत युवकांनी ” दिंडी पथक ” सादरकरून पारंपरिक पद्धतीने गणरायाला निरोप दिला आहे, या वेगळ्या पद्धतीने सादर केलेल्या दिंडी पथकाचे अनेकांनी कौतुक केले आहे.
गणरायाच्या निरोप समारंभात उत्तम प्रकारे टाळ मृदंगाचा ठेका व्हावा यासाठी गेल्या आठ दिवस दररोज सायंकाळी टाळ मृदंगावरील कार्यक्रम सादर केले जात असायचे, शेवटच्या दिवशी गणरायाला निरोप देण्यासाठी गावातून टाळ मृदंगाच्या ठेक्यावर दिंडी पथक सादर करण्यात आले. यामध्ये वारकरी पोशाखात विविध प्रकारच्या टाळावरील पाऊल, रिंगण, फुगडी असे विविध कार्यक्रम सादर केले.
गावातील प्रत्येक चौकात या दिंडी पथकाचे सादरीकरण करून गणरायाचे पारंपारिक पद्धतीने विसर्जन करण्यात आले. मित्र मंडळाने पारंपारिक पद्धतीने केलेल्या विसर्जनाचे व विशेष करून दिंडी पथक सादरीकरणाचे ग्रामस्थांकडून कौतुक करण्यात आले.