अल्पवयीन मुलाजवळ वाहन दिसल्यास पालकांना होणार शिक्षा-पालकांनी सावध होण्याची गरज
करमाळा/संदेश प्रतिनिधी
करमाळा (ता.20) :अल्पवयीन मुलांकडुन सार्वजनिक रस्त्यावर वाहन चालवण्याचे प्रकार वाढत चालले आहेत. त्यामुळे रस्त्यावर अपघात घडत आहेत. अठरा वर्षा खालील मुलांना कायद्यानुसार वाहन चालवण्याचा परवाना देता येत नाही. त्यामुळे पालकांनी अल्पवयीन मुलांना वाहने चालवण्यासाठी देऊ नये. जर पालकांनी अल्पवयीन मुलांना वाहने दिली तर पालकांना शिक्षा व दंड केला जाणार असल्याची माहिती करमाळा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक ज्योतिराम गुंजवटे यांनी दिली.
याविषयी अधिक माहिती देताना ते म्हणाले की, मोटार वाहन कायद्यात दुरूस्ती करण्यात आली आहे. त्यामुळे १८ वर्षा खालील मुलांना वाहन चालवण्यास परवानगी देऊ नये. १६ वर्षा खालील मुलांनी वाहन चालवण्याचा गुन्हा केला तर सदर गुन्हया मध्ये दोषी आढळणाऱ्या मुलाच्या पालकांना ३ वर्ष कारावास व २५,०००/- रुपये दंडाची तरतुद मोटार वाहन कायद्यामध्ये करण्यात आली आहे. तसेच वाहन चालवण्याचा परवाना नसताना वाहन चालविल्यास चालकास ५०००/- रुपये व वाहन मालकास ५०००/- रुपये असा एकुण १०,०००/- रुपये दंड अशा शिक्षेची तरतुद मोटार वाहन कायदया मध्ये करण्यात आलेली आहे. तरी पालकांनी व अल्पवयीन पाल्यांनी यांची गांभीर्याने दखल घ्यावी असे आवाहन पोलीस निरीक्षक ज्योतिराम गुंजवटे यांनी केले आहे.