जागतिक चिमणी दिवस - विशेष लेख - Saptahik Sandesh

जागतिक चिमणी दिवस – विशेष लेख

आज 20 मार्च जागतिक चिमणी दिन मानवी वस्ती जवळ राहणाऱ्या चिमण्यांची संख्या गेल्या काही वर्षात झपाट्याने घटू लागली आहे त्याबद्दल जागृतीसाठी हा दिवस जगभर साजरा केला जातो त्यानिमित्ताने…

अगदी लहान असल्यापासून माणसाला ज्या पक्षाची ओळख करून दिली जाते त्यात चिऊताईचा क्रमांक सगळ्यात वरचा असतो. आपल्या अंगणात नाचणारी घरांच्या अवतीभवती उडणारी आणि चिवचिवाट करणारी चिऊताई आज बेघर झाली आहे . वेगाने होणारे शहरीकरण हे त्याचे मुख्य कारण होय मार्च 2010 पासून 20 मार्च हा जागतिक चिमणी दिन म्हणून साजरा केला जातो गेल्या काही वर्षात आशिया देशातील चिमण्यांची संख्या घटू लागली असून भारतात त्याचे सर्वाधिक प्रमाण आहे.चिमणी बद्दल जागृती होण्यासाठी 2012 मध्ये चिमणी हा राज पक्षी म्हणून घोषित केले आहे.

चिमण्यांची संख्या घटल्याने या चिमण्यांनो परत फिरा रे…. अशी साथ घालण्याची वेळ आपल्यावर येऊन पोहोचली आहे त्यासाठी पोषक वातावरण निर्माण करणे व त्यांच्यासाठी घरटी बांधून अन्न पाण्याची सोय करणे हे महत्त्वाचे कार्य आहे अशाच प्रकारचा उपक्रम मी दहा वर्षापासून सुरू केला आहे त्याबद्दल थोडं काही..

पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी निसर्गातील प्रत्येक घटकाला जपणे महत्वाचे आहे. आपलं जगणं आणि पुढच्या पिढीचं बालपण रम्य करण्यासाठी चिऊताई नक्कीच हवी. आपल्या किलबिलाटानं आयुष्याचं भावविश्व समृद्ध करणाऱ्या चिऊताईचं अस्तित्व अन् वैभव जपणं म्हणूनच गरजेचं आहे. सध्या देशभरातील चिमण्यांच्या अनेक जाती नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. त्यातील अनेक जाती तर इतिहासजमा झाल्या आहेत. म्हणून 20 मार्च हा दिवस जागतिक चिमणी दिवस म्हणून साजरा केला जात आहे.

2007- 2008 पासून इयत्ताअ नववी ते 12 वी या वर्गातील मुलांना पर्यावरण शिक्षण हे सक्तीचे करण्यात आले याचे कारण म्हणजे मानवाच्या हव्यासापोटी मानव पर्यावरणाचा खूप मोठ्या प्रमाणावर नाश करत आहे हे कुठेतरी थांबण्यासाठी शालेय जीवनापासून मुलांना पर्यावरण संवर्धनाची जाण निर्माण व्हावी यासाठी पर्यावरण शिक्षण दिले जात आहे. इयत्ता अकरावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना पर्यावरण विषय शिकवण्याची जबाबदारी माझ्यावरती आली होती. पर्यावरण विषय शिकवत असताना फक्त पुस्तकी ज्ञान न देता कृतिशील शिक्षण देणे गरजेचे होते आणि अशा कृतिशील शिक्षणाची सुरूवात स्वतःपासून करावी म्हणून मी नामशेष होत चाललेल्या प्राणी, पक्षी ,वनस्पती यांच्या अनेक प्रजाती पैकी चिमणी ही प्रजाती निवडली अलीकडच्या काळामध्ये वाढते तापमान, कीटकनाशक फवारणी ,त्याचबरोबर टॉवर्स, विद्युत तारांचे जाळे, शहरीकरण आशा अनेक कारणामुळे चिमण्यांचे प्रमाण अतिशय घटले आहे तेव्हा त्यांचे संतुलन राखण्यासाठी चिमण्यांस सुरक्षित घर मिळावे ही कल्पना माझ्या मनात आली. मी घराच्या पोर्च मध्ये प्लायवूड पासून तयार केलेले एक चौकोनी बॉक्स चे घरटे बांधले .थोड्या दिवसाने चिमण्यांना सुरक्षित जागेची चाहूल लागली व त्या घरट्यामध्ये गवत काडी ठेवून अंडी घालण्याची तयारी करत होत्या .थोड्या दिवसानंतर असं लक्षात आलं की चिमण्यांनी त्या घरट्यामध्ये अंडी घातलेली असावीत. मी मोबाईलच्या कॅमेर्‍याने पाहिले असता मला तीन अंडी दिसली नंतर मी घरट्याच्या सुरक्षेची फार काळजी घेतली .

काही काळानंतर त्या घरट्यातून दोन पिल्ले बाहेर आली मला अतिशय आनंद झाला. घराच्या अवतीभोवती अशाच प्रकारची घरटी तयार करू लावण्यासाठी मुलांना प्रोत्साहन दिले. कालांतराने रॉबिन या पक्षाने देखील त्या चिमण्यांच्या घरट्यावर आक्रमण केले व त्यांनीही अंडी घालून पिल्ले काढली . काही काळानंतर रॉबिन आणि साधी चिमणी यांच्यामध्ये घरट्यासाठी भांडणं होऊ लागली त्यामुळे मी दुसरे घरटे तयार केले ते घरटे साध्या पुठ्ठ्याचे आहे त्याला एक दरवाजा आणि एक झरोका ठेवला आहे. प्रवेशद्वार अतिशय लहान ठेवल्यामुळे रॉबिन या पक्ष्याला आत जाता येत नाही फक्त साधी चिमणीच त्यात प्रवेश करते. साध्या चिमण्यांना त्या घाट्याचा फायदा झाला आहे. अशा पद्धतीने माझ्या घराच्या परिसरामध्ये वर्षाला किमान आठ पिल्ले तरी चिमण्या व रॉबिन जन्माला घालतात.

त्यांच्यासाठी मी पाण्याची सोय केलेली आहे . खाद्याची सोय करण्याची गरज मला भासली नाही कारण कीटक , खरकटे अन्न हेच त्यांना पुरेसे होते आणि खाद्य ठेवून त्यांच्या पुढच्या पिढीला परावलंबी करण्याचा माझा माणस नव्हता . मी एकदाही त्यांना अन्न ठेवत नाही परंतु पाण्यासाठी सुंदर असे पाणवठे तयार केले आहेत त्यामध्ये चिमण्या आंघोळ करतात, खेळतात, पाण्यातच भांडण ही करतात हे गमतीशीर खेळ मला अनेक वेळा पाहायला मिळतात. अशा पद्धतीने मी चिमणी संवर्धनाचा हा उपक्रम केलेला आहे. वीस मार्च हा जागतिक चिमणी दिन म्हणून साजरा केला जातो त्यानिमित्त मी केलेला उपक्रम आपणापुढे ठेवून ज्यांना शक्य असेल त्यांनी अशाच पद्धतीने वेगवेगळे उपक्रम राबवावेत व पर्यावरण संवर्धन करावे हीच अपेक्षा.

प्रा. धनंजय विठ्ठल पन्हाळकर, मु.पो. जामसंडे तालुका देवगड जिल्हा सिंधुदुर्ग/ नेरले (ता.करमाळा) Mo.9423303768

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!