पाणी म्हणजे जीवन .. हेच आपले स्पंदन - Saptahik Sandesh

पाणी म्हणजे जीवन .. हेच आपले स्पंदन

सध्या उन्हाळ्याची चाहूल लागलेली आहे तेव्हा प्रत्येकाला पाण्याचे महत्व समजत आहे, तरी देखील मानव पाण्याचा
योग्य वापर करत नाही. अन्न वस्त्र निवारा या मानवाच्या मूलभूत गरजा आपण शालेय जीवनामध्ये शिकलो आहोत परंतु माझ्या दृष्टीने अन्न, पाणी आणि हवा या तीन मानवाच्या मूलभूत गरजा आहेत कारण निवारा नसला तर माणूस किती दिवस जगू शकतो परंतु हवा नसेल तर माणूस आठ सेकंदापेक्षा जास्त जगू शकणार नाही म्हणून मी निवारा ऐवजी सर्वांना मोफत मिळणाऱ्या हवेला मानवाची तिसरी मूलभूत गरज समजतो. अन्न, हवा, पाणी या तीन पैकी मानवाला अन्नाचा शोध घेण्यासाठी कष्ट करावे लागते परंतु हवा आणि पाणी हे निसर्गामध्ये सहजासहजी मिळते परंतु सध्या प्रदूषणामुळे स्वच्छ हवा आणि पाणी मिळवण्यासाठी माणसाची धडपड चालू आहे.

प्राचीन काळापासून मानवाने पाणी हे जीवन मानले आहे. कारण पूर्वीपासून मानव वस्ती या नदीच्या काठी वसलेले आहेत. याचे कारण म्हणजे मानवाला पाण्याची खूप गरज आहे. अन्न मिळवण्यासाठी देखील पाण्याची आवश्यकता असते. म्हणून मानव पाण्याचा उपयोग करून शेती पिकवतो व पहिली मूलभूत गरज भागवण्याचा प्रयत्न करतो. मानवाप्रमाणेच पशुपक्ष्यांना देखील पाण्याची खूप गरज आहे. त्यामुळे पशुपक्षी देखील ज्या ठिकाणी पाण्याचे साठे आहेत त्या ठिकाणी वास्तव्य करण्याचा प्रयत्न करतात. परंतु अलीकडच्या काळामध्ये औद्योगीकरण झाल्यामुळे अनेक ठिकाणी वृक्षतोड झाली पाण्याचे स्रोत कमी झाले त्यामुळे पशुपक्ष्यांसाठी देखील कृत्रिम पाणवटे करण्याची वेळ आली आहे. आज उन्हाळ्यामध्ये शहरामध्ये कित्येक जण आपल्या परिसरात पक्षांसाठी पाण्याची सोय करतात याचे कारण म्हणजे पर्यावरणातील पाण्याचे स्रोत कमी होत चालले आहेत.

माणूस जन्माला येण्यापूर्वीपासून मानवाला पाण्याची आवश्यकता असते याचे उदाहरण म्हणजे जेव्हा बाळ
गर्भाशयात असते तेव्हा कधी कधी डॉक्टर म्हणतात गर्भाशयात पाण्याचे प्रमाण कमी झाले आहे तेव्हा बाळाची वाढ योग्य पद्धतीने होणार नाही, याचा अर्थ गर्भाशयात बाळाची वाढ होण्यासाठी देखील पाण्याची आवश्यकता लागते. मानवी शरीरामध्ये प्रत्येक अवयवांमध्ये पाण्याचे प्रमाण खूप असते लहान बालकांमध्ये ते 75 टक्के असते पुरुषांच्याशरीरामध्ये 60 टक्के असते आणि स्त्रियांमध्ये ते 55% असते मानवी मेंदूमध्ये पाण्याचे प्रमाण 73 टक्के असते तर मूत्रपिंडामध्ये 98 टक्के असते यावरून मानवी शरीराला पाण्याची किती गरज आहे हे आपल्या लक्षात येईल. आपण दैनंदिन जीवनामध्ये बोलत असताना पाणी या शब्दाला अनुसरून अनेक म्हणीचा वापर करतो यावरून असे लक्षात येते की पाण्याला मानवी जीवनामध्ये किती महत्त्वाचे स्थान आहे.

त्या म्हणी पैकी काही म्हणी पुढील प्रमाणे ‘पाणी जोखणे’, ‘पाणी पाजणे’, ‘लाथ मारीन तिथे पाणी काढीन’,‘काळजाचे पाणी पाणी होणे’, ‘आळवा वरचे पाणी’, ‘पालथ्या घड्यावर पाणी’, ‘पाण्यासारखा पैसा खर्च करणे’, ‘तळे राखील तो पाणी चाकी’, ‘देवाची करणी आणि नारळात पाणी’, ‘दुसऱ्याच्या ओंजळीने पाणी पिणे’ अशा कितीतरी म्हणी आपण दैनंदिन जीवनामध्ये वापरण्याचे कारण म्हणजे पाण्याला आपल्या जीवनामध्ये अतिशय महत्त्व आहे. अलीकडच्या काळामध्ये धरणातील पाण्याच्या वाटपासाठी गटांमध्ये संघर्ष निर्माण झाला की ‘पाणी पेटले’ असा शब्दप्रयोग वापरला जातो.
हायड्रोजनचे दोन अणू आणि ऑक्सिजनचा एक अणू यांचा संयोग म्हणजे पाणी होय. पृथ्वीवर 71.9%
भाग हा पाण्याने व्यापला आहे परंतु यातील बहुतांश भाग खाऱ्या पाण्याचा आहे त्यामुळे ते पाणी शेतीसाठी किंवा
पिण्यासाठी वापरता येत नाही शेतीची उत्पादने व कारखानदारी यासाठी मुबलक प्रमाणामध्ये पाणी लागते त्यामुळे मानवाला शुद्ध पाणी पिण्यासाठी वन वन भटकावे लागत आहे. कारखानदारीमुळे अशुद्ध पाणी नद्यांना
सोडल्यामुळे नद्या प्रदूषित झालेले आहेत. याचे उदाहरण म्हणजे कोल्हापूरची पंचगंगा नदी होय.

त्याचबरोबर शेतीमध्ये अनेक कीटकनाशके खते यांचा भलेमार वापर केल्यामुळे पावसाळ्यामध्ये यातील रासायनिक घटक पाण्यात मिसळतात आणि त्यामुळे पाण्याचे साठे प्रदूषित होतात. मानवाने हव्यासापोटी भूगर्भातील पाणीसाठे देखील संपुष्टात आणण्याचा प्रयत्न केला आहे. याचे परिणाम पुढच्या पिढीला भोगावे लागणार आहेत. तेव्हा प्रत्येक व्यक्तीने पाणी हे जीवन आहे असे समजून काटकसरीने पाणी वापरणे गरजेचे आहे. प्रत्येक व्यक्तीला दैनंदिन जीवनामध्ये रोज 120 ते 130 लिटर पाणी पुरेशी आहे. परंतु आज राहणीमानाचा दर्जा उंचावलेला असल्यामुळे मानव अंघोळीसाठी शावर, टब-बाथ यांचा वापर करत असल्यामुळे पाण्याचा वापर खूप केला जातो. जमिनीमध्ये पाणी मुरवण्याची क्षमता आपल्या देशामध्ये अत्यल्प आहे. अमेरिकेमध्ये जवळजवळ 250 टक्के पाणी जमिनीत मुरवण्याचा प्रयत्न केला जातो. परंतु आपल्याकडे हे दहा टक्के देखील नाही त्यामुळे भूगर्भातील पातळी देखील वाढणं महत्त्वाचं आहे. भूगर्भातील पाण्याची पातळी वाढवण्यासाठी मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करणे गरजेचे आहे. पुढील पिढीसाठी शाश्वत पाणी
स्रोत टिकवायचे असतील तर आत्तापासूनच मानवाने पाण्याचा वापर योग्य करून पाणीसाठे वाढवण्याचा प्रयत्न करणे गरजेचे आहे तेव्हा पाण्याच्या प्रत्येक थेंबाला आपल्या शरीरातील रक्ताच्या थेंबाएवढे महत्त्व देणे आवश्यक आहे.

Prof. Dhananjay Panhalkar
प्रा.धनंजय पन्हाळकर, देवगड, (मो.9423303768)
pani mhanje jivan hech aple spandan | Dhananjay panhalkar article on importance of water | saptahik Sandesh

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!