नेरले येथे शिवछत्रपती कुस्ती संकुलाचे उद्घाटन

करमाळा(दि.१५): दिनांक १२ एप्रिल रोजी नेरले येथील गौंडरे फाटा येथे वस्ताद बापूसाहेब जगदाळे बहुउद्देशीय सामाजिक संस्था संचलित शिवछत्रपती कुस्ती संकुलाचे आणि हनुमान मूर्ती स्थापना सोहळ्याचे हनुमान जयंतीनिमित्त उद्घाटन करण्यात आले.

या वेळी संस्थेचे अध्यक्ष व NIS प्रमाणित कुस्ती प्रशिक्षक हर्षल जगदाळे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना सांगितले की, “या कुस्ती संकुलाची स्थापना स्थानिक ग्रामस्थांच्या सहकार्याने व मदतीने करण्यात आली आहे. या परिसरात पूर्वी कुस्तीचे तालीम केंद्र नव्हते, त्यामुळे आता या संकुलाच्या माध्यमातून मुलांना नियमित व्यायाम व योग्य मार्गदर्शन मिळेल, यासाठी मी पूर्ण प्रयत्न करणार आहे.”
ते पुढे म्हणाले, “आज अनेक चांगले पैलवान असूनही, तालीम बंद झाल्यानंतर त्यांना समाजात योग्य मान मिळत नाही. त्यामुळे या संकुलातून आदर्श पैलवान घडवण्याचा आणि त्यांना राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर नेण्याचा मानस आहे. महाराष्ट्र केसरी, हिंदकेसरी होणं हे या मुलांचं ध्येय असावं.”

पालकांनी देखील आपल्या मुलांकडे लक्ष देणे आवश्यक आहे, असं सांगत जगदाळे म्हणाले, “आजच्या काळात मुलांवर लक्ष ठेवायला पालकांना वेळ नसतो. त्यामुळे पिढी चुकीच्या मार्गाला जाते. प्रत्येक घरात मुलांना लाड केले जातात, पण व्यायाम आणि शिस्त हीच खरी गरज आहे. तालीम ही एक अशी जागा आहे जिथे पैलवानाला खरा मान मिळतो.”

कार्यक्रमासाठी गुरुवर्य आदरणीय महादेव ठवरे वस्ताद, सोनारी मठाचे अधिपती महाराज, महेश भैय्यासाहेब डोंगरे, जयराज कदम, सिद्धेश्वर नाना आगलावे, पत्रकार संतोष राऊत, सतीश बापू निळ, दादासाहेब कोल्हटकर, अण्णासाहेब कदम, व वस्ताद मंडळींसह सर्व मित्र परिवार उपस्थित होते.


