श्री उत्तरेश्वर देवस्थानच्या अन्नछत्राचा १३ वा वर्धापन दिन विविध धार्मिक कार्यक्रमांनी साजरा

केम(संजय जाधव) : केम (ता. करमाळा) येथील ग्रामदैवत श्री उत्तरेश्वर देवस्थानच्या अन्नछत्राचा १३ वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

सकाळी ७ वाजता श्रींचा अभिषेक करण्यात आला. त्यानंतर सकाळी ८ ते १० या वेळेत सामूहिक सत्यनारायण महापूजा पार पडली. या पूजेमध्ये एकूण २१ जोडपी सहभागी झाली होती.
त्यानंतर सकाळी १० ते १२ या वेळेत ह. भ. प. अनिरुद्ध निंबाळकर महाराज यांचे प्रभावी कीर्तन झाले. या कीर्तनास कव्हे येथील भजन शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी संगीतसाथ दिली. गायक म्हणून रमेश तळेकर तर तबलावादक म्हणून नारायण टोंपे यांनी साथ दिली. कीर्तनानंतर सत्यनारायणाची उत्तरपूजा पार पडली आणि त्यानंतर आलेल्या हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.

या सर्व कार्यक्रमांची उत्तम आखणी श्री उत्तरेश्वर देवस्थान कमिटी व गावकऱ्यांनी केली होती. त्यांचे विशेष परिश्रम या यशस्वी आयोजनामागे होते.

श्री उत्तरेश्वर देवस्थानच्या अन्नछत्राच्या वर्धापन दिनानिमित्त येथील शिवलिंगास वडाच्या पारूची सुंदर सजावट करण्यात आली होती. ही सजावट मंदिराचे पुजारी समाधान गुरव व त्यांच्या सहकाऱ्यांनी केली होती. सजावटीने मंदिरात दर्शनासाठी आलेल्या भाविकांचे लक्ष वेधून घेतले. भाविकांनी याचे विशेष कौतुक केले.



