खासदार नाईक निंबाळकर यांच्याकडून पोंधवडी-वंजारवाडी चारीच्या कामाची पाहणी – तालुक्यातील ५००० हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार..
करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा : करमाळा तालुक्यातील पोंधवडी-वंजारवाडी चारीच्या कामाची पाहणी शुक्रवारी माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी पाहणी केली. या चारीचे काम गेल्या वीस वर्षांपासून चालू होते, या चारीच्या कामासाठी खा.नाईक निंबाळकर यांनी पाठपुरावा केला होता. यावेळी बोलताना खा.नाईक निंबाळकर म्हणाले की, ३१ जानेवारी रोजी झालेल्या बैठकीध्ये या कामासाठी निधी देण्याचे ठरले होते आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे मार्चमध्ये या कामाला ६० कोटी रुपये निधी मंजूर झाला. हे काम पूर्ण झाल्याने लवकरच तालुक्यातील ५००० हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे.
यावेळी खा. नाईक निंबाळकर यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांचे आभार मानले तसेच याकामी सहकार्य करणाऱ्या सर्व लोकप्रतिनिधींचे आभार मानले.विहाळ परिसरातून भैरवनाथ कारखान्याकडून जाणाऱ्या मार्गावर येळे वस्ती येथून पोंधवडी येथे गेलेल्या या चारीत कुकडीचे पाणी सोडण्याचे नियोजन आहे. यामुळे परिसरातील सुमारे पाच हजार हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे.अनेक वर्षांची प्रतीक्षा केल्यानंतर या चारीचे काम पूर्ण झाल्यामुळे परिसरातील शेतकरी वर्गाकडून समाधान व्यक्त केले जात आहे. या पाहणी दौऱ्यावेळी भाजपचे तालुकाध्यक्ष गणेश चिवटे, महाराष्ट्र चॅम्पियन अफसर जाधव, बाळासाहेब कुंभार, वाशिंबेचे उपसरपंच अमोल पवार, जयंत काळे-पाटील, गणेश गोसावी, सरपंच काकासाहेब सरडे यांच्यासह परिसरातील अनेक शेतकरी उपस्थित होते.