कोतमिरे यांच्यामुळेच जिल्हा बँकेचा नावलौकीक – अनिल कवडे
करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा : सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँक अडचणीतून बाहेर काढण्यासाठी शैलेश कोतमिरे यांनी जीवाचे रान केले. जिल्हा बँकेची काम करण्याची संधी म्हणून त्यांनी या बँकेकडे पाहिले. या बँकेमध्ये उत्पन्नाचे स्त्रोत निर्माण करून सभासदांमध्ये विश्वासार्हता निर्माण केली. ग्राहकांमध्ये बँकेविषयी निर्माण झालेले नैराश्य दूर करण्याचे काम कोतमिरे यांनी केले. त्यांच्या या कामाला सर्व कर्मचाऱ्यांनी चांगली साथ दिली. त्यामुळे जिल्हा बँकेचा नावलौकिक आज महाराष्ट्रात होत आहे; असे प्रतिपादन राज्याचे सहकार आयुक्त अनिल कवडे यांनी केले.
राज्य पुणे सहकारी संस्थेचे अप्पर निबंधक शैलेश कोतमिरे यांनी सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेवर प्रशासक म्हणून उल्लेखनिय काम केल्याबद्दल त्यांचा व यशकल्याणी सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष गणेश करे-पाटील यांचा इंडोनेशिया येथे बायोटेक्नॉलॉजी जैवतंत्रज्ञान कॉन्फरन्ससाठी निवड होऊन यशस्वी दौरा केल्याबद्दल ग्रामसुधार समितीच्या वतीने यशकल्याणी सेवाभवन येथे सत्कार समारंभ आयोजित केला होता. त्याप्रसंगी श्री. कवडे बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्रामसुधार समितीचे अध्यक्ष डॉ.ॲड. बाबूराव हिरडे हे होते.
पुढे बोलताना श्री.कवडे म्हणाले, की राज्यातील अनेक सहकारी संस्था अडचणीत आहेत. सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँक अडचणीत असताना त्या ठिकाणी राज्य पातळीवरचे पद असतानाही कोतमिरे यांनी कोणताही राजकीय दबाव व हस्तक्षेप याचा विचार न करता या बँकेची जबाबदारी घेतली व बारा-बारा तास काम करून या बँकेला जीवदान दिले आहे. यातूनच त्यांची बँक, कर्मचारी, सभासद, शेतकरी यांच्याबद्दल असलेली तळमळ लक्षात येते. बँकेत मुक्काम करूनच त्यांनी बँकेचा प्रशासकाचा कारभार चालविला. कर्मचाऱ्यांना विश्वासात घेऊन त्यांना त्यांच्या अधिकाराची जाणीव करून दिली. एवढेच नाहीतर लिडर कसा असावा, हे ही त्यांनी बँकेच्या माध्यमातून दाखवून दिले आहे. त्यांनी स्वत:ला झोकून देऊन या बँकेला संकटातून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न केले. त्यांची ही धडपड पाहून तेवढ्याच ताकदीने कर्मचारी त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहिले.
कोतमिरे यांनी इतरांमध्ये कामाची प्रेरणा निर्माण करून या बँकेबाबत सभासदांमध्ये निर्माण झालेले नैराश्य दूर करण्याचे काम केले. एवढेच नाहीतर वेगवेगळ्या उत्पन्नाचे स्त्रोत निर्माण करून ग्राहक व सभासदात विश्वास निर्माण केला व त्यातून ठेवी गोळा करून कर्जवाटपही केले. तसेच बचत गटांना कर्ज वाटप करून त्यांची वसुलीचे प्रमाणही थकीत ठेवले नाही. त्यामुळे बँकेला आर्थिक अडचणीतून बाहेर यायला मदत झाली. बँकेची जबाबदारी मिळालेली संधी म्हणून त्यांनी पार पाडली असून, त्यात ते यशस्वी झाले आहेत. असे सांगून त्यांनी कोतमिरेच्या कार्याचा गौरव केला. कोतमिरे यांचा झालेला सत्कार हा योग्यच असून या सत्काराने त्यांना पुढील कामासाठी अधिक बळ मिळणार आहे. यावेळी सहकारवर बोलताना कवडे म्हणाले, की विचार सुधारलातर सहकार सुधारेल. सहकाराचे चित्र आजही चांगले आहे असे नाही. पूर्वी विकास सोसायट्या या गावच्या आर्थिक नाड्या होत्या. परंतू राजकीय हस्तक्षेपामुळे या सोसायट्याही थकीत राहिल्या व पर्यायाने सर्वसामान्य शेतकऱ्यांना कर्ज मिळू शकले नाही. त्यासाठी प्रत्येकाने प्रामाणिक प्रयत्न करून काम करण्याची गरज आहे. असे सांगून त्यांनी शैक्षणिक, सामाजिक विषयावर मार्गदर्शन केले.
यावेळी सत्काराला उत्तर देताना कोतमिरे म्हणाले, की जिल्हा बँकेचा प्रशासक म्हणून काम करताना मला जे स्वातंत्र्य मिळाले त्या जोरावरच मी बँकेला गतवैभव मिळवून देण्यासाठी यशस्वी ठरलो आहे. या कामासाठी बँकेचे सर्व खातेदार, ठेवीदार, कर्जदार, अधिकारी, कर्मचारी यांनी मला जे सहकार्य केले आहे त्यांचाच खऱ्या अर्थाने हा सत्कार आहे.
अधिकारी म्हणून काम करताना तळागाळातील लोकांसाठी आपण किती काम करतो हे महत्वाचे आहे. या सत्कारवेळी मला काम केल्याचे खरे समाधान मिळाले आहे. सोलापूर बँकेचा कारभार मी अगदी जवळून पाहिला होता, त्यामुळे या बँकेला अडचणीतून काढण्याचे माझी मनापासून तळमळ होती व हे मोठे आवाहन असतानाही मी वरीष्ठ पातळीवरून बँकेचा
प्रशासक म्हणून निवडण्याची विनंती केली व मला या बँकेवर प्रशासक म्हणून नेमले. बीड, नांदेड, उस्मानाबाद वर्धा, बुलढाणा, नागपूर या बँका अडचणीत आल्या होत्या. परंतू ज्यावेळी नाशिक बँक अडचणीत आली त्यावेळी मला धक्का बसला होता. जिल्हा बँक अडचणीत येणे हे शेतकऱ्यांच्या दृष्टीने अवघड असते. कारण सरकारी बँका या मोठ्यांना कर्ज देतात परंतू छोट्या शेतकऱ्यांना डावलतात. त्यामुळे छोटे शेतकरी अडचणीत येऊन त्यांना सावकाराकडे जावे लागते. त्यासाठी जिल्हा बँका चालणे गरजेचे आहे.
जिल्हा बँकेचे काम करताना कर्मचाऱ्यांना विश्वासात घेऊन अहोरात्र काम केले. प्रत्येक शाखेला भेटी देऊन तेथील समस्या जाणून घेऊन कर्मचारी व ठेवीदारास विश्वासात घेतले. बँक बाहेर काढायची एवढाच उद्देश डोळ्यासमोर ठेवून आम्ही सर्वांनी काम केले व त्यात आम्ही यशस्वी झालो.
यावेळी त्यांनी बँकेतील अडथळे व त्यावर मार्ग कसे काढले हे सविस्तर सांगितले. एवढेच नाहीतर समोर उपस्थित असलेल्या अधिकारी व कर्मचारी यांना थेट प्रश्न उपस्थित करून त्यांचे कामकाज सर्वांसमोर अचूक मांडले.
यावेळी यशकल्याणी संस्थेचे अध्यक्ष गणेश करे-पाटील, ग्रामसुधार समितीचे अध्यक्ष ॲड. हिरडे यांची भाषणे झाली. मानपत्र वाचन निलकंठ ताकमोगे यांनी केले. याप्रसंगी कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा बँकेचे टाकळी शाखेचे शाखाधिकारी राजेंद्र रणसिंग यांनी केले. पाहूण्यांचे स्वागत पत्रकार गजेंद्र पोळ, एन.डी.सुरवसे, डी.जी.पाखरे, आकाश मंगवडे, संजय हंडे, अनिल माने यांनी केले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सचिन गाडेकर यांनी केले. उपस्थितांचे आभार अंधश्रध्दा निर्मुलन समितीचे व्ही. आर. गायकवाड यांनी मानले.
यावेळी बाजार समितीचे सभापती प्रा. शिवाजीराव बंडगर, सहाय्यक निबंधक दिलीप तिजोरे, आदिनाथचे माजी उपाध्यक्ष शहाजीराव देशमुख, प्रगतशील शेतकरी अर्जुन तकीक यांच्यासह बँकेचे अधिकारी, कर्मचारी, सेक्रेटरी व सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.