कोळगाव धरण ओव्हर फ्लो – नेरले तलावात पाणी सुरू – आमदार संजयमामा शिंदे
करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा (ता.२६) : कोळगाव धरण लाभक्षेत्रात पावसाची संततधार सुरू असल्यामुळे कोळगाव धरण 25 सप्टेंबरच्या मध्यरात्रीपासून ‘ओव्हर फ्लो’ झाले असून, त्या धरणांमधून ‘ओव्हर फ्लो’ चे पाणी सोडण्याची प्रक्रिया सुरू असून या पार्श्वभूमीवर धरणातून वाहून जाणारे ‘ओव्हर फ्लो’चे पाणी करमाळा तालुक्यातील गौंडरे व नेरले तलावात सोडण्यात यावे, अशी मागणी करमाळा तालुक्याचे आमदार संजयमामा शिंदे यांनी उस्मानाबाद पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता यांच्याकडे केली आहे.
याबाबत पुढे त्यांनी म्हटले की,आवाटी शाखा कालवा दुरुस्त करून नेरले तलावात पाणी सोडण्यात यावे. महादेव धोंडे यांचे शेताजवळील मातीकाम प्रत्येक पावसाळ्यामध्ये वाहून जात आहे. कालवा फुटणे , शेतकऱ्यांची शेती वाहून जाणे असे २० वर्षापासून नुकसान होत आहे. सदर शेतकऱ्यांना अद्याप पर्यंत नुकसान भरपाई न दिल्यामुळे त्यांनी फुटलेल्या कालव्याचे काम अडवले आहे .त्यामुळे सद्यस्थितीत नेरले तलावात पाणी सोडणे जिकिरीचे झाले आहे.
सन 2022 च्या अखेर पर्यंत सदर कॅनॉलचे अस्तरीकरण करून आवाटी शाखा कालवा १ ते १५ किमी गाळ , झाडे-झुडपे काढून नेरले तलावात पूर्ण दाबाने पाणी पोहोचण्याच्या दृष्टीने योग्य ती उपाययोजना करावी.
कोळगाव धरण ओव्हर फ्लो झाल्यानंतर आ.संजयमामा शिंदे यांनी अधीक्षक अभियंता यांच्याशी भ्रमणध्वनी द्वारे चर्चा केली असता लवकरच कोळगाव धरणावरून करमाळा बाजूकडील उपसा सिंचन योजना कार्यान्वित करून नेरले व गौंडरे येथील तलावात पाणी सोडण्यात येईल अशी माहिती अधिक्षक अभियंता यांनी दिली आहे.