केम येथे भरदिवसा घरफोडी; ३.१५ लाखांचा ऐवज लंपास

केम(संजय जाधव) : केम येथील जनई वस्तीवर भरदिवसा अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करत सुमारे ३ लाख १५ हजारांचा ऐवज लंपास केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी करमाळा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

फिर्यादी रघुनाथ सुखदेव तळेकर (वय ५५) यांनी दिलेल्या माहितीनुसार, ५ एप्रिल रोजी सकाळी त्यांची पत्नी विठाबाई शेजारील शेतकऱ्याकडे कांदा कापणीच्या कामासाठी गेल्या होत्या. तर दुपारी मुलगा सोमनाथ हा डिझेल आणण्यासाठी ढवळस (ता. माढा) येथील पंपावर गेला होता. ते स्वतः घराजवळील आंब्याच्या झाडाखाली आराम करण्यास गेले होते.
दरम्यान, दुपारी ३ वाजता तळेकर हे पाणी पिण्यासाठी घरी आले असता घराचा दरवाजा उघडा दिसला. घरात डोकावून पाहिले असता घरातील सामान अस्ताव्यस्त पडलेले दिसले. लगेचच त्यांनी मुलास फोन करून माहिती दिली. काही वेळातच वस्तीवरील नागरिक जमा झाले. घरात पाहणी केली असता कपाट उघडे दिसले. त्यातील लॉकर तोडून त्यामधील रोख रक्कम व सोन्याचे दागिने चोरीला गेल्याचे उघडकीस आले.

तळेकर यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरोधात करमाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चोरीस गेलेल्या ऐवजात ४० हजार रुपये रोख रक्कम व अंदाजे १ लाख ५० हजार रुपये किमतीचे ३० ग्रॅम वजनाचे सोन्याचे गंठन, अंदाजे १ लाख रुपये किमतीचे २० ग्रॅम वजनाचे सोन्याच्या साखळीतील लॉकेट, अंदाजे २५ हजार रुपये किमतीची पिळ्याची अंगठी असा एकूण ३ लाख १५ हजारांचा ऐवज आहे. पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक पोपट टिळेकर हे करत आहेत.
फिर्यादी रघुनाथ तळेकर यांनी संदेश प्रतिनिधीशी बोलताना सांगितले की, वास्तविक माझे साडेनऊ तोळे सोने चोरीला गेलेले आहे परंतु पंचनामा करताना पाच तोळेच गेले असल्याचा पंचनामा करण्यात आलेला आहे. मी याबाबत पोलीस निरीक्षकांशी चर्चा करणार आहे.
केम मध्ये या आधी देखील अनेक मोठ्या चोऱ्या झालेल्या आहेत परंतु अद्याप एकाही चोरीचा तपास लागलेला नाही त्यामुळे नागरिकांचा पोलिसांवरील विश्वास उडालेला आहे.




