रामनवमीनिमित्त केममध्ये अखंड हरिनाम सप्ताह उत्साहात संपन्न

केम (संजय जाधव) : येथील श्री राम मंदिरात रामनवमीनिमित्त अखंड हरिनाम सप्ताह अत्यंत भक्तिभावात व उत्साहात साजरा करण्यात आला. या सप्ताहानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

पहाटे ४ ते ६ दरम्यान काकड आरती, सकाळी ८.३० ते दुपारी १२.३० गाथा पारायण, सायंकाळी ६ ते ७ हरिपाठ व रात्री ९ ते ११ कीर्तन अशा भक्तिमय कार्यक्रमांनी सप्ताह आयोजित करण्यात आला होता. या सप्ताहात ह.भ.प. पाटील महाराज, ह.भ.प. मुकुंद तरंग महाराज, ह.भ.प. रामभाऊ निंबाळकर, ह.भ.प. विठ्ठल पाटील महाराज, ह.भ.प. सुधीर महाराज वालवडकर, ह.भ.प. मिलिंद गुडेकर यांनी आपले कीर्तन व प्रवचन सेवा दिली. रामनवमीच्या दिवशी सकाळी १० ते १२ या वेळेत ह.भ.प. सुरेश थिटे महाराज यांचे कीर्तन झाले. दुपारी बारा वाजून पाच मिनिटांनी श्रीराम जन्मानंतर मंदिरात गुलाल व पुष्पवृष्टी करत भक्तांनी आनंदोत्सव साजरा केला. त्यानंतर रामाची आरती व महिला भक्तांनी रामाचा पाळणा म्हणत भक्तिरसात रंग भरला.

या कार्यक्रमानंतर कै. सावतीराम तळेकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ त्यांच्या परिवाराच्या वतीने भाविकांना महाप्रसाद वाटप करण्यात आला. या प्रसंगी मोठ्या संख्येने भाविकांनी उपस्थित राहून लाभ घेतला. या अखंड हरिनाम सप्ताहाच्या यशस्वी आयोजनासाठी श्री राम भजनी मंडळ, केम यांनी विशेष परिश्रम घेतले.

श्री निवृत्तीनाथ दिंडीचे चालक मनु महाराज बेलापूरकर यांच्या मातोश्रींचे पंढरपूर येथे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या निधनाबद्दल श्री राम भजनी मंडळ, केम यांच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.




