करमाळा शहरातील दुर्गंधीकडे नगरपालिकेच्या आरोग्य विभागाने तातडीने लक्ष घालावे – नगरसेविका राजश्री माने यांची मागणी
करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा : करमाळा शहरात काही दिवसांपासून जोरदार पाऊस होत आहे. या पावसामुळे शहरातील गटारीचे पाणी रस्त्यावर वाहत आहे. गटारी तुडुंब भरून वाहत आहेत, त्यामुळे रस्त्यावर कचरा येतो. त्यातून दुर्गंधी पसरत आहे. याकडे सर्व परिस्थितीकडे नगरपालिकेच्या आरोग्य विभागाने तातडीने लक्ष घालावे अशी मागणी नगरसेविका राजश्री माने यांनी केली आहे.
याबाबत पुढे बोलताना त्यांनी सांगितले की, करमाळा शहर व तालुक्यात परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला आहे. करमाळा शहरातही जोरदार पाऊस झाला आहे. पावसाचे पाणी गटारीत न बसल्याने रस्त्यावरून वाहिले आहे. त्यात कचरा अडकतो. त्यातून दुर्गंधी पसरत आहे. त्यातून आरोग्याचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यामुळे नगरपालिकेने याकडे गांभीर्याने पहावे. डासांचे प्रमाण वाढत असून त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी त्वरित धुराडीद्वारे फवारणी करून घ्यावी, अशी मागणी नगरसेविका माने यांनी केली आहे.