लेखक जगदीश ओहोळ यांच्या पुस्तकाला 'नेल्सन मंडेला पुरस्कार' प्रदान - Saptahik Sandesh

लेखक जगदीश ओहोळ यांच्या पुस्तकाला ‘नेल्सन मंडेला पुरस्कार’ प्रदान


करमाळा(दि.३१) : करमाळा तालुक्यातील युवा लेखक जगदीश ओहोळ यांनी लिहिलेल्या ‘जग बदलणारा बापमाणूस’ या पुस्तकाला ‘जागतिक आंबेडकरवादी साहित्य महामंडळा’च्या वतीने ‘नेल्सन मंडेला पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. आर्यवृत्त आंतरराष्ट्रीय विद्यापीठ त्रिपुराचे कुलगुरू प्रा.डॉ. प्रकाश करमाडकर यांच्या हस्ते लेखक जगदीश ओहोळ यांना  मानचिन्ह, प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. नागपुर येथे काल (दि.३०)  हा सोहळा  पार पडला.

‘जग बदलणारा बापमाणूस’ हे “नव्या पिढीला, नव्या भाषेत, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांगणारे मोटिवेशनल पुस्तक आहे.” अगदी कमी कालावधीमध्ये अधिकाधिक प्रतींची विक्री होऊन या पुस्तकाने मराठी साहित्य विश्वात नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. विशेष म्हणजे या पुस्तकाच्या दहाव्या वृत्तीचे प्रकाशन अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठात झाले आहे. कोलंबिया विद्यापीठात प्रकाशित होणारे ‘जग बदलणारा बापमाणूस’ हे पहिले मराठी पुस्तक ठरले आहे.

यावेळी महाराष्ट्र राज्य साहित्य व सांस्कृतिक मंडळाचे सदस्य डॉ. राजेश गायकवाड, जागतिक आंबेडकरवादी महामंडळाचे अध्यक्ष डॉ. दीपककुमार खोब्रागडे, शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर येथील समाजशास्त्र विभागप्रमुख डॉ. जगन कराडे,साहित्यिक डॉ.विद्याधर बन्सोड यांच्यासह अनेक मान्यवर, वाचक, श्रोते मोठ्या संख्येने उपस्थितीत होते.

डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे चरित्र सर्वांसाठीच प्रेरणादायी आहे, हे ‘जग बदलणारा बापमाणूस’ पुस्तकाच्या माध्यमातून मांडले आहे. नव्या पिढीने, तरुणाईने या पुस्तकाला खूपच मोठ्या प्रमाणावर प्रेम दिले आहे. 14 एप्रिल 2025 रोजी या पुस्तकाच्या हिंदी अनुवादित आवृत्तीचे प्रकाशन होत आहे. आजचा हा नेल्सन मंडेला यांच्या नावाने मिळालेला पुरस्कार पुढील कार्यासाठी अधिक बळ देणारा आहे.
जगदीश ओहोळ, लेखक व वक्ता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!