मिरगव्हाणचे सचिन भस्मे यांना पोलीस महासंचालक पदक प्रदान
करमाळा : मिरगव्हाण (ता.करमाळा) येथील सचिन चंद्रकांत भस्मे यांना उत्कृष्ट कामगिरीबद्दल १५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमात पोलीस महासंचालक पदक प्रदान करण्यात आले. हे पदक त्यांना आयपीएस विनिता शाहू यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.
सचिन भस्मे हे सध्या दौंड शहर पोलिस स्टेशनमध्ये सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी आतापर्यंत पोलीस दलामध्ये 18 वर्षे सेवा बजावली आहे. ही सर्व सेवा त्यांची दौंड शहर व तालुक्यामध्ये झाली आहे.
मिरगव्हाण येथील एका सामान्य शेतकरी कुटुंबातुन आलेले भस्मे यांचे शिक्षण मिरगव्हाण, करमाळा, बार्शी आदी ठिकाणी झाले व त्यानंतर २००५ साली ते कॉन्स्टेबल म्हणून पोलीस दलात भरती झाले.
सचिन भस्मे यांनी वेगवेगळ्या ठिकाणी पार पाडलेले बंदोबस्त, विविध प्रशिक्षण देणे आदी कामगिरीसाठी आतापर्यंतच्या कारकिर्दीत त्यांना १०५ रिवार्ड्स (बक्षिसे) मिळाली असून त्यांचा सीट्रिक्स मार्क्स ए प्लस आहे. ही त्यांची कारकीर्द पाहुन त्यांना यावर्षीचे पोलिस महासंचालक पद जाहीर झाले होते. भस्मे यांना हे पदक प्रदान झाल्यानंतर करमाळा तालुक्यातून विशेषतः मिरगव्हाण परिसरातील ग्रामस्थांकडून त्यांचे विशेष अभिनंदन करण्यात येत आहे.