देवीचामाळ प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी चित्रपटगृहात जाऊन पाहिला छावा चित्रपट

करमाळा(सुरज हिरडे) : धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचा धगधगता आणि जाज्वल्य इतिहास विद्यार्थ्यांना समजावा या हेतूने श्रीदेवीचामाळ (ता.करमाळा) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेने विद्यार्थ्यांना छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित असलेला छावा हा ऐतिहासिक चित्रपट दाखविण्याचा उपक्रम राबविला.
शहरातील छोटू महाराज या सिनेमा टॉकीज मध्ये आज (दि.२२) रोजी सकाळी ९:३० च्या शोला श्रीदेवीचामाळ शाळेतील पहिली ते चौथीच्या वर्गातील सुमारे ७० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. सर्व विद्यार्थ्यांनी शाळेचा गणवेश परिधान करत हा चित्रपट पाहिला. यावेळी त्यांच्यासोबत मुख्याध्यापक श्रीमती निमकर, उपशिक्षक श्रीमती. जाधव श्रीमती. गुंजाळ व श्री. कडू सर आदी शिक्षक उपस्थित होते.

या उपक्रमाविषयी माहिती देताना शिक्षकांनी सांगितले की, प्राथमिक शालेय पाठ्यपुस्तकांमध्ये शिवाजी महाराजांचा इतिहास अभ्यासक्रमासाठी आहे परंतु संभाजी महाराजांबद्दल विद्यार्थ्यांना जास्त माहिती मिळत नाही. त्यामुळे हा चित्रपट पाहण्याचे आम्ही ठरविले. या चित्रपटातून संभाजी राजांचा पराक्रम पाहिल्याने विद्यार्थ्यांना एक नवी स्फूर्ती मिळाली आहे. तसेच स्वराज्यासाठी संभाजी महाराजांनी कशा हाल अपेष्टा सहन केल्या हे पाहून विद्यार्थी भावुक झाल्याचे शिक्षकांनी सांगितले. या आधी देखील शाळेतील विद्यार्थ्यांना पावनखिंड हा ऐतिहासिक चित्रपट जामखेड येथील चित्रपटगृहात जाऊन दाखविण्यात आला होता. आता करमाळ्यात टॉकीज झाली असल्याने व हा चित्रपट आल्याने चित्रपट दाखविण्याचा उपक्रम शाळेने आयोजित केला. यावेळी विद्यार्थ्यांची येण्याजाण्याची देखील काळजी शाळेकडून घेण्यात आली. या उपक्रमास व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष प्रविण हिरगुडे तसेच सर्व सदस्य यांचेही सहकार्य लाभले.

या उपक्रमाबरोबर शाळेत लोकसहभागातून भिंतीवर शिवचरित्र रेखाटन करण्यात आले आहे. याचे उद्घाटन १९ फेब्रुवारीला शिवजयंती दिवशी तहसीलदार शिल्पा ठोकडे, यशकल्याणी संस्थेचे अध्यक्ष गणेश करे-पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. शिवरायांचा इतिहासातील विविध घटना या भित्तिचित्रामधून दाखविण्यात आले आहे.







